लोकमान्य टिळक मराठी
भाषण
Lokmanya Tilak Marathi Speech
"नेतृत्व ते जहाल ते लोकमान्य होते,
समृद्ध लेखणीची जळती मशाल होते,
परकीय बंदीवास शापीत देश होता ,
पण आग केसरीचा एकेक लेख होता,
त्या सिंहगर्जनेने जागा समाज झाला,
उदयास भारतात स्वातंत्र्यसूर्य आला......!"
सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शितल छाया देणारे परीक्षक, गुरुजन वर्ग आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या बालमित्र आणि मैत्रिणींनो...
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महान स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य टिळक यांचे
पूर्ण नाव 'बाळ गंगाधर टिळक ' असे
होते. त्यांचे नाव केशव असे होते. पण सर्वजण त्यांना लाडाने 'बाळ' असे म्हणत. टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी
जिल्ह्यातील चिखली या गावी झाला.
लहानपणापासूनच अतिशय हुशार आणि तल्लख असलेल्या टिळकांचे गणित आणि संस्कृत हे आवडीचे विषय होते. 'बाळाचे पाय पाळण्यात दिसतात' या युक्तीप्रमाणे लहानपणापासूनच या तेजस्वी सूर्याचे तेज चमकू लागले आणि या तेजात सर्वांचेच डोळे दिपून जाऊ लागले. टिळकांचे गणितातील प्राविण्य तर वाखाणण्याजोगे होते .
एकदा गुरुजी वर्गात गणित शिकवत
होते. सर्व मुलांनी गुरुजींनी दिलेली उदाहरणे वहीत लिहून सोडवायला सुरुवात केली.
टिळकांनी मात्र एकही उदाहरण वहीमध्ये लिहिले नव्हते. गुरुजींनी टिळकांना याबद्दल
विचारले असता वहीमध्ये न लिहिता टिळकांनी सर्व उदाहरणे अचूक उत्तरासहित
व योग्य क्रमाने अचूक सांगितली. टिळकांची ही कुशाग्र बुद्धी व
स्मरणशक्ती पाहून गुरुजींना सुद्धा खूप आश्चर्य वाटले.
टिळकांना बालपणापासूनच अन्यायाविरुद्ध प्रचंड चिड होती. त्यांची बंडखोर
वृत्ती आणि कणखर बाणा लहानपणापासूनच दिसत होता.एकदा टिळक वर्गात बसलेले असताना,
त्यांच्या शेजारच्या बाकावरील मुलांनी शेंगा खाऊन टरफलं टिळकांच्या
बाकाखाली टाकली. गुरुजी वर्गात आल्यावर त्यांनी
टिळकांना उभे केले आणि त्यांना ओरडून बाकाखालील टरफलं उचलण्यास सांगितले.
तेव्हा टिळक अतिशय ठामपणे म्हणाले की, “ मी
शेंगा खाल्ल्या नाही , मी टरफलं उचलणार नाही” आणि त्यांनी टरफले उचलण्यास साफ नकार
दिला. किती हे धाडस! किती ही हिम्मत! आणि किती ही अन्यायाविरुद्ध चीड! पुढे याच वृत्तीने टिळकांना शांत बसू दिले
नाही. याच वृत्तीने त्यांना संघर्ष शिकवला. इंग्रज सरकारच्या अन्या्या्विरुद्ध बंड
पुकारण्यासाठी!
लहानपणापासूनच
त्यांना उत्साही आणि उत्कट राष्ट्रवादी आणि
क्रांतिकारी कार्यात भाग घेण्याची खूप आवड होती. वयाच्या सोळाव्या वर्षी टिळक
मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. पुढे त्यांनी बी.ए. व एल. एल. बी. ची परीक्षाही
उत्तीर्ण केली. इसवी सन 1880 मध्ये त्यांनी गोपाळ गणेश आगरकर
आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली आणि 1885
मध्ये त्यांनी फर्ग्युसन कॉलेज सुरू केले.
टिळकांनी लोक जागृतीसाठी 'मराठा' व 'केसरी' ही वृत्तपत्रे सुरु
केली. त्याचबरोबर सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती हे उत्सव सुरू केले. लोकांनी
एकत्र यावे आणि त्यांच्या मनात राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण व्हावी हा त्यामागील
उद्देश होता. 1896 मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला
होता. टिळकांनी शेतकऱ्यांना संघटित होण्याचे आवाहन
केले. त्यांच्या हक्काबद्दल जागृत केले आणि केसरी वर्तमानपत्रातून त्यांनी सरकारला
त्यांच्या हक्काची जाणीव करून दिली. 1897 पुण्यात
आलेल्या प्लेगच्या साथीच्या काळात टिळकांची भूमिका महत्त्वपूर्ण
ठरली. भारतीय समाजाचा नाश करण्यासाठी इंग्रजांनी केलेले अत्याचार पाहिल्यानंतर
टिळकांनी आपले संपूर्ण जीवन भारत आणि भारतीय जनतेला ब्रिटिशांच्या जुलमी राजवटी
पासून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी समर्पित केले. टिळकांच्या सिंहगर्जनेने
संपूर्ण इंग्रज सरकार हादरुन जात असे. टिळकांनी संपूर्ण स्वराज्य घेण्याचा निर्धार
केला होता. त्यांच्या नेतृत्वाच्या अनोख्या शैलीमुळे त्यांना जनमानसात लोकप्रिय
केले. इंग्रजांमध्ये तर त्यांची भीतीच पसरली होती.
त्यांना ब्रिटिश सरकारने 'भारतीय असंतोषाचे जनक' असे संबोधले.
"या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?"
"उजाडले पण सूर्य कुठे आहे?"
"राज्य करणे म्हणजे सूड उगवणे
नव्हे!" अशा अग्रलेखांमधून त्यांनी इंग्रज सत्तेवर घणाघात केला.
"कितीही संकटे आली,
आभाळ जरी कोसळले तरी,
त्यावर पाय ठेवून ,
उभा राहील मी", असे
ते म्हणत.
स्वातंत्र्यप्राप्तीसाठी
त्यांनी स्वतःला झोकून दिले होते. 'देश कार्य म्हणजे
देवकार्य' हा विचार त्यांनी भारतीय समाजामध्ये रुजवला आणि
इंग्रजांना सळो की पळो करून सोडले
.
भारत मातेच्या या अनमोल रत्नाचे 1 ऑगस्ट
1920 रोजी आजारपणामुळे निधन झाले. भारतीयांमध्ये
राष्ट्रीयत्वाची भावना जागृत करणारे असे थोर व्यक्तिमत्व आपल्याला लाभले, याचा मला फार अभिमान आहे. शेवटी मी एवढेच म्हणेन.....
"पदोपदी पसरून निखारे आपल्याच हाती,
होऊनिया बेभान धावले भारत मातेसाठी,
कधी न थांबले विश्रांतीस्तव,पाहिले
न मागे,
संघर्षातून विणले त्यांनी स्वातंत्र्याचे धागे."
धन्यवाद!
No comments:
Post a Comment