Wednesday, September 7, 2022

उतारा व त्यावरील प्रश्न संच 01

 

खालील उतारा नीट वाचून त्याखालील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या .

 गुण – ६

नागझिरा अरण्यात १९७८ सालच्या मे महिन्यात मी महिनाभर तळ्याच्या काठी असलेल्या झोपडीत राहिलो आणि वानरांच्या टोळ्या पहिल्या.रेखाटनं केली .नोंदी केल्या .त्यातूनच जे पुस्तक जन्माला आलं – ते नागझिरा .ह्या पुस्तकात वानरं म्हणून एक स्वतंत्र प्रकरण आहे.वानरांच्या दोन टोळ्या मला इथे बघायला मिळाल्या .ही माणसांच्या फार जवळची आहेत , असं वाटायला लावील ,असंच वानरांचं सगळं वागणं होतं.नागझिराच्या निवांत मुक्कामात निरीक्षणाशिवाय मला दुसरा काही उद्योग नव्हता .वानरं पुष्कळ होती.बुजरी नव्हती .ह्या अरण्यात चितळ होती,रानडुक्करं होती,गवे होते ,रानकुत्री होती.ह्या सर्व प्राण्यांपेक्षा वानरं जास्त होती.ती सहज दृष्टीला पडत.एखादी टोळी हेरून तिचा दिवसभराचा दिनक्रमही पाहता येई.मी रानात केलेले निरीक्षण , इतर अभ्यासकांनी भारतात वेळोवेळी केलेल्या निरीक्षणांवर आधारित ग्रंथांचं वाचन ,कल्पकता यांचं मिश्रण होऊन त्यातून ‘सत्तांतर’हे पुस्तक जन्माला आले.

 

प्रश्न -१ – या उताऱ्यातून किती पुस्तकांचा जन्म झाल्याचे सांगितले आहे ?

१ ) एक

२) दोन

३) तीन

४) एकही नाही
प्रश्न -२- लेखकाने ही पुस्तके कोणत्या प्राण्याविषयी लिहिली आहेत ?

१) गवे

२) रानकुत्री

३) वानरे

४) चितळे

प्रश्न -३- या उताऱ्यातून लेखकाला कोणत्या गोष्टीविषयी सांगायचे आहे ?

१) कल्पकता व निर्मिती

२) फिरणे

३) निवांतपणे राहणे

४) प्राण्यांना पाहणे

 

 

 

 

 

उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे लाल रंगाने ठळक केली आहेत ती पुढीलप्रमाणे –

प्रश्न -१ – या उताऱ्यातून किती पुस्तकांचा जन्म झाल्याचे सांगितले आहे ?

१ ) एक

२) दोन

३) तीन

४) एकही नाही
प्रश्न -२- लेखकाने ही पुस्तके कोणत्या प्राण्याविषयी लिहिली आहेत ?

१) गवे

२) रानकुत्री

३) वानरे

४) चितळे

प्रश्न -३- या उताऱ्यातून लेखकाला कोणत्या गोष्टीविषयी सांगायचे आहे ?

१) कल्पकता व निर्मिती

२) फिरणे

३) निवांतपणे राहणे

४) प्राण्यांना पाहणे

 

 

Monday, August 29, 2022

वाक्प्रचार व त्यांचा अर्थ


    


      


      वाक्प्रचार व त्यांचे अर्थ 

 1.डोळे दिपणे - आनंदाने डोळे चमकणे.

 2.जाहीर करणे - सर्वांना सांगणे.

 3. आभार मानणे- कृतज्ञता व्यक्त करणे,            धन्यवाद देणे.

 4. खजील होणे - शरम वाटणे.

 5. आश्चर्यचकित होणे - नवल वाटणे.

 6. मान्य करणे - कबूल करणे.

 7. स्वैर हिंडणे - मोकाट फिरणे.

 8. भक्ष्य मिळवणे - अन्न मिळवणे.

 9. बाचाबाची होणे - शाब्दिक भांडण होणे.

 10. मन मोहून टाकणे - मन गुंतून पडणे.

 11. स्वाधीन करणे - देणे सुपूर्द करणे.

 12. साह्य करणे - मदत करणे.

13. काया झिजवणे -

         दुसऱ्यांच्या भल्यासाठी कष्ट करणे.


 14. गौरव करणे - सन्मान करणे.

 15. भान हरपणे - गुंग होणे.

 16. सौजन्य दाखवणे -

             चांगुलपणा दाखवणे.

 17. आज्ञा पाळणे - आदेश मानणे.

 18. वंदन करणे - नमस्कार करणे.

 19. वेळ खर्च करणे -

            वेळ सत्कारणी लावणे.

 20. पसार होणे - पळून जाणे, निघून जाणे.

 21. रंगून जाणे -

           गुंग होणे, मग्न होणे, गर्क होणे.

 22. पांगापांग होणे - गर्दी विरळ होणे.

 23. भडीमार करणे - जोराचा मारा करणे.

 24. बाजू घेणे - कड घेणे,म्हणणे पटणे.

 25. हुशारी येणे - तरतरी येणे, बरे वाटणे.

 26. तणतणणे - रागाने बडबडत जाणे.

 27. अभिवादन करणे - नमस्कार करणे.

 28. स्वागत करणे -

         चांगल्या प्रकारे या म्हणणे.

 29. मार्ग काढणे - 

           रस्ता काढणे बाहेर पडणे.

 30.  मलूल होणे  - निस्तेज होणे कोमेजणे.

 31. करुणा उत्पन्न होणे - दया उत्पन्न होणे.

 32. अपशब्द वापरणे -

             वाईट शब्द उच्चारणे.

 33. सल्लामसलत करणे -

             विचारविनिमय करणे.

34.  दर्शन घेणे - पाहणे, भेटणे.

 35. हात पाय हलवणे - काम करणे.

 36. ऐट दाखवणे - रुबाब दाखवणे.

 37. शरीर राबवणे - कष्ट करणे.

 38. खांद्याला खांदा लावून काम करणे

    - एकमेकांना सहकार्य करून काम करणे.

 39.अभिमान वाटणे -

       योग्य असा गर्व वाटणे.

 40. निश्चय करणे - ठाम निर्धार करणे.

 41. वसाहत करणे -  वस्ती करणे.

42.धारण करणे - अंगीकारणे.

 43.हौस असणे - आवड असणे.

 44.नाद लागणे -

       आवड निर्माण होणे, छंद जडणे.

 45. हट्ट धरणे -  हेका धरणे.

 कौतूक वाटणे - अप्रूप वाटणे.

 स्फूर्ती मिळणे - प्रेरणा मिळणे.

 



Sunday, August 28, 2022

विमानाचा शोध कसा लागला?


विमानाचा शोध कसा लागला?


आज विमानातून प्रवास करणं अगदी सामान्य गोष्ट झाली आहे. पण, ज्या वेळी विमान ही कल्पना अस्तित्वात नव्हती त्या वेळी आकाशात पक्ष्यांची भरारी बघून हवाई सफर करण्याची कल्पना प्रथम राईट बंधूंनी केली. चार वर्षांच्या अथक परिश्रमानंतर आणि वारंवार अपयश आल्यानंतरही आपले स्वप्न साकार करण्याची जिद्द या स्वप्नाला आकार देऊ शकली. राईट बंधूंनी पृथ्वी ते आकाश यामधील सीमारेषा पुसून टाकण्यासाठी जो संयम ठेवला तो खरोखरच एक आदर्शच म्हणायला हवा. १७ डिसेंबर १९०३ रोजी अमेरिकन वेळेनुसार सकाळी १० वाजून ३५ मिनिटांनी ज्या वेळी राईट बंधूंनी विमान क्षेत्राच्या नव्या उपलब्धीला स्पर्श केला तेव्हा त्यांच्या सोबत डॅनियल नावाचे एक प्रत्यक्षदर्शी उपस्थित होती. याबाबात नंतर डॅनियल यांनी आपल्या आठवणी लिहिताना म्हटले होते की, ऑरविले आणि विल्बर राईट या बंधूंनी आपल्या स्वतःच्याच उपलब्धीकडे आश्चर्याने बघितले होते आणि त्यातून त्यांना मोठे साहस लाभले होते.




 आविष्काराच्या दिवशी हवामान खूप थंड होते. साधारण २७ मैल प्रति तास या वेगाने हवा वाहत होती. तरी पण राईट बंधूंनी तीन प्रयत्न केले. जे संमिश्र समाधान देणारे होते. मात्र चौथा प्रयत्न १०० टक्के यश देणारा होता.


त्यानंतर १७ डिसेंबर हा दिवस विमानाची पहिली भरारी घेणारा दिवस म्हणून ओळखला जाऊ लागला. विमानाच्या शोधाच्या दहा वर्षांनंतर ऑलीव्हर यांनी सांगितले, 'आज मी २७ मैल प्रति तास वेगाने वाहणाऱ्या हवेच्या मध्ये एका अजब यंत्रावर त्याच्या सुरक्षिततेबद्दल माहित असूनही पहिल्यांदा भरारी घेण्याच्या बाबत विचार करत शकत आहे. आज एवढ्या वर्षांनंतर ज्या यंत्राबद्दल काही माहीत नव्हते त्यावर स्वार होऊन एवढे साहस करणे मला

आश्चर्यचकित वाटते.' चौथ्यांदा प्रयत्न केल्यानंतर जी भरारी यशस्वी ठरली त्या वेळचे विमान ७०० पौंडाचे होते. त्यासाठी राईट बंधूंनी कॅरोलिनामध्ये एक ट्रॅकही तयार केला होता. राईट बंधूंच्या विमानशोधाची कथा १८८९ पासून सुरू होते. अमेरिकेतील ओहिओ येथे राहणाऱ्या या दोन भावांपैकी राईट यांनी स्मीथ सोनियन इन्स्टिट्यूटला पत्र लिहून आकाशात उडण्याचा प्रयोग करण्याची माहिती मागवली होती. त्यानंतर या बंधूंनी पक्ष्यांच्या आकाशात उडण्याच्या पद्धतीचा सूक्ष्म अभ्यास केला. उंचावर पोहोचल्यानंतर पक्षी कशा प्रकारे आपले पंख मुड़पतात आणि हवेच्या वाहण्याच्या वेगानुसार वळणे, वर जाणे किंवा किंवा खाली येण्यासाठी कशाप्रकारे पंखांचा वापर करतात याचेदेखील त्यांनी खूप निरीक्षण केले. या अभ्यासानंतर राईट बंधूंनी ग्लायडर बनवण्यास सुरुवात केली. १९०० मध्ये राईट बंधूंनी ५० पौंड वजनाचे आणि १७ फूट लांब तर १९०१ मध्ये १०० पौंड वजनी आणि २२ फूट लांब पंखांच्या ग्लायडरचे निरीक्षण आणि परीक्षण सुरू केले. यावर संतुष्ट न झाल्यामुळे त्यांनी २२ फूट लांब पंखांच्या आणखी एक ग्लायडरचा प्रयोग केला. आणखी पुढची दोन वर्षे त्यांची परीक्षणे सतत सुरू होती. २००३ च्या शेवटी त्यांना अखेर विमानाचा शोध लागला आणि विमान भरारी करण्यात ते यशस्वी ठरले.

Tuesday, August 23, 2022

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन


    


  डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

                डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी झाला. ते एक जातिवंत शिक्षक, आदर्शवादी विचारवंत आणि महान तत्त्वज्ञ होते. कृतीशील कर्तृत्वाने त्यांनी संपूर्ण शिक्षकवर्गापुढे अनेक आदर्श ठेवले. त्यामुळे 'शिक्षकांचे शिक्षक' अशीही त्यांची ओळख आहे.

               सन १९६२ मध्ये ते भारताचे राष्ट्रपती झाले. तेव्हापासून त्यांचा जन्मदिन 'शिक्षक दिन' म्हणून साजरा केला जातो. 'शिक्षक हा शिक्षणाचा केंद्रबिंदू आहे', असे त्यांचे ठाम मत होते. शिक्षकाबद्दल म्हणजेच गुरुबद्दल आदरभावना व्यक्त करणे हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे.

शिक्षक आणि शिक्षण हे समाजोद्धाराचे प्रभावी साधन आहे. शिक्षकांनी शिक्षणात चांगल्या परंपरा टिकवून नव्या' चांगल्या परंपरासुद्धा निर्माण केल्या पाहिजेत. शिक्षण हे आत्मोन्नती, व्यक्तीमधील परिपूर्णता आणि उपजीविकेचे साधन आहे. विद्यार्थी-विद्यार्थिनी ज्या

शिक्षणामुळे चारित्र्यवान बनतील तेच खरे शिक्षण ते होय. 'कर्तृत्व, वक्तृत्व, भाषा प्रभूत्व, ज्ञानप्रियता, दी तादात्मता, व्यासंग यापैकी एखादा जरी गुण शिक्षकाजवळ असेल तर तो उत्तम शिक्षक ठरतो', असे ते नेहमी म्हणत. त्यांच्याजवळ हे सर्वच गुण होते अन् म्हणूनच ते आदर्श शिक्षक म्हणून लोकप्रिय झाले.

 'शिक्षकांचे शिक्षण सुंदर असावे आणि त्यात नित्य नाविन्य असावे. कारण शिक्षण हा प्रगतीचा चा पाया आहे, त्यामुळे तो जास्तीत जास्त बळकट A. कसा होईल हे पाहण्याची जबाबदारी शिक्षकांची ना आहे, असे त्यांचे मत होते. विद्यार्थ्यांचा नैतिक व च आत्मिक विकास घडणे गरजेचे असून हे पुण्यकर्म शिक्षकांनीच करायचे असते. 'समस्त विद्यार्थी. वी हे शिक्षकांचे दैवत असून शिक्षकांनी विद्यार्थी घडवण्यासाठी केलेली धडपड ही पूजा असून शिक्षण संस्था हे मंदिर आहे.' या अतिशय सहज ती सोप्या शब्दात त्यांनी शिक्षक व शिक्षणाचे महत्त्व चे वर्णन केले आहे.

न्या दुर्दैवाने अलीकडे काही वर्षांपासून गटबाजी

व राजकारणाची किड शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राला लागली आहे. शिक्षण प्रणाली बदलली अन् शिक्षकही बदलले.


'हाडाचे शिक्षक' आज दुर्मीळ होत चाललेत. 'उदरभरणासाठी शिक्षकीपेशा' असेच चित्र आजकाल जवळजवळ दिसून येत आहे. जीवनाविषयीचा एक सुसंस्कारित, विधायक, सामाजिक जाणिवेचा एक विशिष्ठ दृष्टिकोन तयार होणे हे शिक्षणाचे साध्य आहे. मात्र, प्रत्यक्षात प्रचलित शिक्षण प्रणाली आणि शिक्षकवर्ग या साध्यापासून दूरच होत चाललेला

दिसून येत आहे. भारतीय संस्कृतीत शिक्षकाचे स्थान व दर्जा देवासमान आहे.


'हुकूम किंवा सत्ता गाजवणे हे शिक्षकाचे ब्रीद नसून सेवा, सहानुभूती, संस्कार व आदर हे शिक्षकाचे ब्रीद आहे. उच्चारावरून विद्वत्ता, आवाजावरून नम्रता आणि वर्णनावरून शील समजते. काळजीपूर्वक निरीक्षणासारखा दुसरा शिक्षक नाही. आई आणि शिक्षक यांनी दिलेले शिक्षण आणि संस्कारच माणसाचे भवितव्य उज्ज्वल किंवा अंधःकारमय बनवतात. म्हणून शिक्षकांनी आत्मीयतेने शिकवले पाहिजे.' हे डॉ. राधाकृष्णन यांचे शिक्षकाविषयीचे मत होते. सद्यपरिस्थितीत शिक्षणक्षेत्रात नवनवीन अभ्यासक्रम नूतन पद्धतीने सुरू करून त्यांची प्रत्यक्ष कृतीत कार्यवाही करणे नितांत गरजेचे आहे. पर्यावरण संरक्षण संवर्धन, प्रदूषण समस्या निर्मूलन, आपत्कालीन व्यवस्थापन, प्रथमोपचार, ★ उद्योजकता विकास माहिती तंत्रज्ञान या प्रचलित विषयांचे विद्यार्थ्यांना ज्ञान देणे अत्यावश्यक आहे.


१७ एप्रिल १९७५ रोजी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन पंचत्वात विलीन झाले. देशभरात सर्वत्र त्यांच्या स्मृत्यर्थ दरवर्षी ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षकदिन म्हणून साजरा केला जातो, तो साजरा करणे हे एक औपचारिक कर्तव्य आहे. त्यांची आदर्शवादी तत्त्वे, शिक्षक, शिकवणे याबाबतची नीतिमूल्ये पाळली गेली तरच या. शिक्षकदिनाचा सर्वार्थाने गौरव होईल. डॉ. राधाकृष्णन हे एक चालते बोलते विद्यापीठ होते. राजकीय क्षेत्रात सक्रिय राहूनदेखील त्यांन शिक्षणक्षेत्रात कधीच राजकारण केले नाही. या सर्व गोष्टींचा विचार शिक्षण क्षेत्राशी निगडित सर्वांनीच करणे गरजेचे आहे.

Sunday, August 21, 2022

कर्मवीर भाऊराव पाटील






र्मवीर भाऊराव पाटील

                         मानवी समुदायाच्या अथांग सागरात अशी काही नररत्ने असतात की जी आपल्या तेजाने, दैदिप्यमान चारित्र्याने आणि कर्तृत्वाने सतत चमकत असतात व सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात. याच शिवरायांच्या पवित्र महाराष्ट्र भूमीत ज्यांनी झोपलेल्याला जागे केले उठलेल्याला उभे केले, उभे असलेल्याला चालायला लावले, चालणाऱ्याला पळायला लावले आणि पळणाऱ्याच्या हाती अज्ञान, अंध:कार नाहीसा करण्यासाठी ज्ञानाची ज्योत दिली. त्या शिक्षणमहर्षी कर्मवीर आण्णांना बिनम्र अभिवादन करून त्यांच्या शैक्षणिक कर्तृत्वाची दिशा मी मांडणार आहे.






"शिक्षण हाच मानवाचा तिसरा डोळा आहे." असे निक्षून सांगणाऱ्या त्यागमूर्ती मानकऱ्याचा जन्म २२ सप्टेंबर १८८७ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी झाला.






                          आण्णांवर गंगामाई या त्यांच्या मातेने त्याग व साधुत्वाचे सुंदर संस्कार कैले. भाऊरावांच्या कार्यक्रमाची सुरूवात मातेस आदराने वंदन करूनच होत असे. बाहेर जाण्याअगोदर विनम्र भावाने वंदन करून ते आपल्या कामास निघत आईच्या आज्ञेचे पालन करून, नतमस्तक होऊन आशीर्वाद मागणारी रत्ने पुढे कर्तृत्वाने अमरत्वास पोहोचल्याची जी काही उदाहरणे आहेत त्यात युगपुरूष शिवछत्रपती, राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आधुनिक शिक्षणमहर्षी कर्मवीर आण्णा हे होत. भाऊरावांची मातेवरची निष्ठा अतुट अढळ आणि सात्विक अशीच होती. बाल भाऊराव अत्यंत खेळकर व हूड प्रवृत्तीचे असल्याने त्यांच्या करारी व कर्मठ पित्यांना असे वाटे की, भाऊरावांनी खूप शिकावे, पदवी मिळबाबी. पण आण्णा बालपणात सवंगड्याबरोबर रानोमाळ भटकले. रामलिंग व बाहुबलीचा डोंगर त्यांनी अनेक वेळा पायी तुडविला.


पोहणे, झाडावर चढणे, खेळणे व व्यायाम याची त्यांना आवड होती.

कुस्तीच्या व्यायामामुळे त्यांचे शरीर बलदंड झाले ते तसेच निर्भयी व स्वाभिमानी

बनले.






त्यांच्या बालपणीची एक घटना अंगावर शहारे आणणारी आहे. लहानपणी

नदीत पोहत असताना सुसरीपुढे न घाबरता ते दंड थोपटून उभे राहिले होते..

कारण 'भीती' हा शब्दच त्यांना ठाऊक नव्हता.


जन्मताच निसर्गाने त्यांना दोन गोष्टी दिल्या होत्या-एक म्हणजे धिप्पाड

देहयष्टी व गडगडणारा पहाडी आवाज,

याच आवाजाने अखिल महाराष्ट्रात शिक्षणाचा 'रयतरूपी पहाड' त्यांनी उभा केला.लहानपणीच कुंभोज भागातील सत्याप्पा भोसले नावाच्या बंडखोर

क्रांतिकारकाच्या बेडर स्वभावाचे आण्णांच्या अंतःकरणात बीजारोपण झाले.

सत्याप्पाचे शौर्य व साहस त्यांनी ऐकले होते. सत्याप्पा गरीबांचा

मित्र होता. आपणही दीन-दलित रयतेचे मित्र व्हावे, असे आण्णांना नेहमी

वाटे. कोल्हापूरच्या कोर्टात सत्याप्पाने गावची आठवण म्हणून चपला मागितल्या.

आण्णांनी आपल्या चपला सत्याप्पाला लगेच देऊन टाकल्या. त्या केवळ सत्तूचंडखोरावरील प्रेमामुळेच !






समाजामध्ये समतेची भावना निर्माण करून स्वाबलंबनातून शिक्षणाच्या

मोहिमेस न्यायाची वैचारिक बैठक निर्माण करण्याच्या भूमिकेतून दिनांक ६ आक्टोबर

१९१९ साली काले येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना वसतिगृहांच्या रूपाने

कार्यान्वित केली.वसतिगृहाबरोबर शाळा, कॉलेजीस, ट्रेनिंग कॉलेजीस सुरू करून शिक्षणाचे

एक महान पर्व आणि ज्योतिराव फुल्यांची इच्छा प्रत्यक्ष कृतीत आणण्याचे

काम कर्मवीरांनी केले.





ज्ञानदेव घोलपासारख्या एका अस्पृश्य विद्यार्थ्यावर झालेला अन्याय कर्मवीरांनी

कोल्हापूर व सातारच्या ज्ञान पाणपोईत घालून दूर केला. हाच ज्ञानदेव घोलप

आण्णांच्या मार्गदर्शनामुळे पुढे अस्पृश्यांचा आदर्श दीपस्तंभ ठरला. १९२४ साली राजर्षि शाहूंच्या नावाने एक निधर्मी वसतिगृह सुरू केले. या वसतिगृहाचे नामकरण

महात्मा गांधींच्या हस्ते केले. उदघाटनसमारंभाच्या वेळी बापूजी एका प्रसंगाने

अचंबित झाले----:






अज्ञानाच्या अंधःकारात मिटल्या मनाने जगणाऱ्या हरिजनांच्या समाजातील

प्रकाशकिरण ठरला असा विद्यार्थी हरीच्या मनावर अवलंबून न राहता कर्मवीरांच्या

या शाहू बोर्डिंगात स्वतःच्या बळाने आणि भाऊरावांच्या प्रेरणेने संस्कृत विषयात

पहिल्या वर्गात पहिला आला. ते ऐकून महात्मा गांधीना महदाश्चर्य वाटले. अत्यंत आनंद झाला या विद्यार्थ्याच्या वर्गात त्याकाळी ९९% विद्यार्थी उच्च वर्णीय

होते. विद्येची कुठलीही परंपरा नसणारा विद्यार्थी देवानी केलेल्या भाषेत अव्वल दर्जाचे यश संपादन करू शकतो, हा 'रयते'चा चमत्कार महात्मा गांधीनी पाहिलाआणि आपल्या गळ्यातील हार त्या विद्यार्थ्यांच्या गळ्यात घातला. परंपरेच्या,सनातन्यांच्या विद्येची मक्तेदारी संपल्याचे प्रतीक म्हणजे तो हार होता. नव्या युगाची प्रासादचिन्हे त्या हारात गुंफली गेली होती. सनातन्यांच्या बालेकिल्यात सिंहाच्या आचाळीतील केस उपटणाऱ्या म.फुले यांची ती विजयध्वजा होती. हे घडविले म्हणून घडले.






कर्मवीरांच्या वसतिगृहात सर्व धर्मीय विद्यार्थी एकत्र राहतात, जेवतात,

ज्ञानाचा लाभ घेतात हे पाहून महात्मा गांधीना आनंद झाला. वसतिगृहांचे थोरपण त्यांनी  जाणले. आणि प्रशंसोद्गार  काढले. या भरतखंडातील हे एकमेव उदाहरणअसल्याचा निर्वाळा गांधीजीनी दिला ते म्हणाले "जे साबरमती आश्रमात मला जमले नाही ते भाऊरावांनी या ठिकाणी करून दाखविले. "






कर्मवीरांचे अस्पृश्यता निर्मुलनाचे व शैक्षणिक कार्य भारताच्या सामाजिक

इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्याइतके गौरवपूर्ण आहे.

'कमवा आणि शिका' Earn and Learn या योजनेचेआण्णांच प्रवर्तक आहेत.

भाऊराव मोठी पदवी मिळवू शकले नाहीत पण भगीरथ प्रयत्नांनी

बहूजन समाजाला 'ज्ञानगंगा' उपलब्ध करून देऊ शकले.






थोर माणसे काळाची गरज म्हणनू जन्माला येतात आणि तेजस्वी

व अलौकिक कार्य करून जातात. कर्मवीरानी शिक्षण प्रसाराचे पवित्र कार्य

महाराष्ट्रात केले. स्वाभिमानी व स्वावलंबी शिक्षण मिळया असा संदेश देणाऱ्या रयत शिक्षण संस्थचे बोधचिन्ह वटवृक्ष

आज लाखो ज्ञानदेव शिक्षण घेत आहेत.

आहे त्या वटवृक्षाच्या छायेत

कवि वि. म. कुलकर्णीच्या शब्दांत

पांखी फुट्या पाखरांसाठी

पवित्र असा वटवृक्ष

जो वस्तीला आला

रोविला

त्याला ताटामधला घास दिला

आडवे उभे गुंफित धागे

उबदार असे घरटे रचले

खांद्यावर घेतली कावड

खाली कधी ठेवली नाही

दिव्यावर लावीत दिवा

गंगाकाठ चालत राहावा".


भाऊरावांचे शैक्षणिक कार्य पाहून एका अमेरिकन शिक्षणतज्ञाने त्यांना

आर्थिक सहाय्य देऊ केले ते पाहून खडीच्या ढीगाकडे बोट दाखवून आण्णा

स्वाभिमानाने म्हणाले,


"These are my heap of dollars."

कर्मवीरांच्या ‘स्वाबलंबन,स्वाभिमान, स्वाध्याय, समता' या चतु:सुत्रीचा देशातील


शिक्षण क्षेत्रापुढे आदर्श आहे. आज रयतेच्या मुलांचे शिक्षणाचे कार्य करणारी

संस्था केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील एक अग्रेसर संस्था आहे.


सध्या या संस्थेमार्फत ३५ महाविद्यालये, ३२६ माध्यामिक शाळा,

८ अध्यापन महाविद्यालये, ११ प्राथमिक शाळा, ८३ वसतिगृहे व सुमारे ५०

इतर शाखा चालविल्या जात आहेत.


या संस्थेत सुमारे ३ लाख विद्यार्थी शिकत असून ८८-८९ चे

वार्षिक बजेट ४१ कोटी ५७ लाख रुपयांचे आहे.


रयत शिक्षण संस्था हे जणू श्रीकृष्णाने अर्जुनाला दाखविलेले विश्वरूप

दर्शन आहे. त्यागमूर्ति कर्मवीर हे अमृतपानाचे मानकरी आहेत की ज्यांना सारा

महाराष्ट्र वंदन करतो.  त्यांच्या अलौकिक कार्यामुळे जनता प्रेमाने त्यांना 'कर्मवीर' म्हणून

लागली. भारत सरकारने 'पद्मभूषण' हा किताब देऊन गौरव केला तर पुणे

विद्यापीठाने 'डॉक्टर ऑफ लिटरेचर' ही पदवी देऊन सन्मान केला.

आचार्य विनोबा भावे आण्णांच्याबद्दल एकदा म्हणाले होते


"भाऊरावांचे कार्य सतत प्रकाश देणाऱ्या नंदादीपाप्रमाणे आहे."


डोक्याला शिरस्त्राण नाही, पायात पादत्राण नाही पण पहाडी देहात

युगायुगांचे ध्येयवादी त्राण ओसंडून वाहत आहे. अशा अवस्थेत आण्णांनी शिक्षण

प्रसारासाठी महाराष्ट्रभर वणवण केली..


ज्ञानगंगेच्या तळाशी शेवाळ्यात अस्पष्ट झालेली, अंध:काराच्या थराथरातून

खोलवर रुजलेली रत्ने वर आणून सोडणारा आणि सतत आयुष्यभर संघर्ष करून

दीन-दलितांच्या आयुष्यातील अंधार वादळ वाऱ्याबरोबर झगडत नाहीसा करणारा

हा दीप ९ मे १९५९ रोजी अनंतात विलीन झाला. परंतु हजारों ज्ञानदीप

चेतवून, पेटवून गेला.


सातारच्या अजिंक्य ताऱ्याच्या पायथ्याशी डोंगर उतरणीवर कर्मवीरांची

समाधी आहे व तेथेच पुतळाही आहे तो आण्णांचा भव्य पुतळा आपल्या

सर्वांना निरंतर स्फूर्ती देत राहील यात शंका नाही या समाधीबद्दल कवी शिलेदार

म्हणतात


या चार भिंतीवर विलसे दिव्य समाधी,

हा रयतपुरीचा राजघाटहो त्यागी,

ही मूर्ति देवो

स्फूर्ति सतत विरागी,

स्वर्गस्थ सुरांची

पुष्पवृष्टी दिनरात

तो अमर जाहला

कर्मवीर जगतात'.


धन्यवाद !

शिक्षक दिन मराठी भाषण



5 सप्टेंबर - शिक्षक दिन मराठी भाषण 


प्राचीन कालखंडापासून आपल्या देशामध्ये गुरुपरंपरेला फार महत्व आहे. पूर्वी या देशामध्ये गुरूच्या कुलात जाऊन विद्यार्थी ज्ञानाचे धडे घेत होते. त्या पद्धतीला गुरुकुल शिक्षण पद्धती असे आपण पाहतो. आज या देशामध्ये मुले शाळेत जाऊन शिकू लागली. पूर्वी शिक्षण हे वनामध्ये दिले जायचे. आज शिक्षण हे शाळेमध्ये दिले जाते... विद्यार्थ्याची जडणघडणीत त्याच्या गुरुजनांचे योगदान महत्त्वाचे असते. आपल्या देशामध्ये त्याच गुरुजनांचा सन्माननीय शिक्षकांचा यथोचित सन्मान व्हावा, त्यांच्या कार्याचा आढावा, मागोवा लोकांनी घ्यावा याचसाठी शिक्षक दिन हा साजरा केला जातो. भारतामध्ये स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये ५ सप्टेंबर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिन, शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.


एक सामान्य माणूस, उत्तम शिक्षक ते उत्तम प्रशासक या देशाचे राष्ट्रपती हा डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा प्रवास सर्वांच्या समोर आदर्श प्रेरणादायी पहावयास मिळतो. आज शिक्षक दिन साजरा करत असताना आपण आपल्याला ज्ञानाचे, जीवनाचे, आयुष्याचे, कला, क्रीडा, साहित्य यासारख्या क्षेत्रामध्ये आपणास घडवणाऱ्या गुरुवर्यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा करत असतो. शिक्षक तन, मन, धन, अर्पण आणि समर्पित करून एक पिढी घडविण्याचे पवित्र कार्य करत असतात. या देशामध्ये शिक्षण हे पूर्वी विशिष्ट लोकांची मक्तेदारी होती, पण हे शिक्षण आज सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पोहोचले. या शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षक हे आपणास आपलं आयुष्य संस्कारमय, शिस्तबद्ध परिपूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असतं. याचाच आदर्श आपण घेतला पाहिजे.


शिक्षक हा समाजाचा आरसा असतो. अज्ञांनी मुलाला ज्ञानी बनवतो. विद्यार्थ्यातील दुर्गुण बाजूला काढून त्याच्या सद्गुणांना वाव देतो. उत्तम खेळाडू, उत्तम प्रशिक्षक, उत्तम वक्ता, उत्तम वैज्ञानिक घडविण्यासाठी शिक्षक हे अविरतपणे प्रयत्न करत असतात. समाजाला अशा शिक्षकांची गरज असते. आज देशभरात जगभरात शिक्षकांच्याकडे पाहिले तर हे शिक्षक विद्यार्थ्यांच्यावरती चांगले संस्कार करत असतात. शिक्षकांना सर्वात जास्त आनंद केव्हा मिळत असतो. आपला एखादा

विद्यार्थी सामान्य असेल, पण तो जेव्हा त्यांच्या हाताखाली घडतो व उत्तम व्यक्ती म्हणून । ज्यावेळी समाजात वावरत असतो. त्यावेळी शिक्षकांना आनंद होत असतो. आज शिक्षकांनी आपल्यासमोर वेगवेगळ्या क्षेत्रातील आदर्श ठेवण्याचे कार्य करतात. व्यक्ती मनुष्य आणि विद्यार्थी समाज या सर्व गुणांचा अभ्यास करून शिक्षक एक विचारांची चौकट आपल्यासमोर निर्माण करतात यातून आपण गुरुजनांच्या विचारांचा आदर्श घेतला तर एक नवा समाज, नवी पिढी निर्माण होऊ शकते.


शिक्षण हे प्रत्येक क्षणाला आपल्याला नवीन काहीतरी शिकवण्याचे कार्य करते. तर शिक्षक आपल्याला कृतिशील व्यक्ती बनवण्याचे कार्य करतात. शिक्षक दिनाच्या माध्यमातून या देशामधील करोडो शिक्षकांच्या विचारांनुसार आपण जर आपली योग्य पद्धतीने वाटचाल केली तर एक संस्कारमय, संस्कृतीरक्षक, वैज्ञानिक दृष्टिकोण असणारा विद्यार्थी समाजातून निर्माण होऊ शकतो.


शिक्षक दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी गुरुजींच्या वाणीतून व कृतीतून येणाऱ्या गोष्टींचा संग्रह करून आपण वाटचाल केली तर यशाचा आनंदसुद्धा आपल्याला घेता येऊ शकतो. यासाठीच शिक्षक दिनाच्या निमित्ताने प्रामाणिकपणे पिढी घडविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या गुरुजींच्या विचारांचा आदर्श घेतला पाहिजे.




Saturday, August 20, 2022

जा एकटा पुढे तू

     



        




 

 जा एकटा पुढे तू

 (मराठी अनुवाद )


...... जा एकटा पुढे तू

कोणी जरी न साथी

ना घेतला कुणीही,

संस्नेह हात हाती.

नाही दिली जिवाची,

कोणी जिवास साद

घुमवीत जा तरी तू,

अपुलेच आर्त नाद.

हा मार्ग कंटकांचा,

रक्ताळ पाय झाले

सारे सखे जिवाचे,

मागेच ते गळाले

अंधार हा सभोती,

ही बंद सर्व दारे

घे ध्येयदीप हाती,

जाई पुढेच जा रे.....

- रवींद्रनाथ टागोर


Friday, August 19, 2022

प्रसिद्ध व्यक्ती व त्यांचे उदगार

 









                                     

ll      काही प्रसिद्ध व्यक्तींचे उद्गार ll 

 

             माझे खरे मोठेपण मी मारलेल्या चाळीस लढायांत नसून मी तयार केलेल्या कायदा संहितेत आहे.

                       - नेपोलियन 

रुसो जन्मला नसता तर फ्रेंच राज्यक्रांती घडून आली नसती.

            - नेपोलियन







तुम्हांस जर एक वर्षाची बेगमी करावयाची असेल तर धान्य पेरा ; शंभर वर्षाची बेगमी करावयाची असेल तर माणसे पेरा .- कर्मवीर भाऊराव पाटील 


करा किंवा मरा.( Do or Die .)- महात्मा गांधी .


स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच!

                        - लोकमान्य टिळक 

लोकसंख्यावाढ हा राष्ट्राच्या प्रगतीतील फार मोठा अडसर आहे.

   - रं.धो.कर्वे








जय जवान जय किसान .- लालबहादूर शास्त्री 

सत्य आणि अहिंसा हाच माझा परमेश्वर . - महात्मा गांधी 

लेखण्या सोडा व बंदुका हातात घ्या. - वि.दा.सावरकर 

"तुम मुझे खून दो; मै तुम्हें आझादी दूँँगा l - नेताजी सुभाषचंद्र बोस






माझ्या रक्ताचा एक थेंब देशाचे स्वातंत्र्य आणि एकता यांचे रक्षण करील.- इंदिरा गांधी.

हिंदुत्व हि जितकी स्पृश्यांची मालमत्ता आहे,तितकीच ती अस्पृश्यांची आहे.

- डॉ.बाबासाहेब आंबेडकर 

मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मारणार नाही!

    - डॉ.बाबासाहेब आंबेडकर 

वेदांकडे परत चला . स्वामी दयानंद सरस्वती 

घटनेतील मार्गदर्शक तत्वांचे पूर्णतः अनुपालन झाले तर भारत हा पृथ्वीवरील स्वर्ग होईल.

-    न्या.एम. सी.छगला






सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ? राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे! - लोकमान्य टिळक 

पन्नास वर्षे !  ब्रिटिश राज्य तोवर टिकेल ना? स्वा. सावरकर

चलो दिल्ली! -सुभाषचंद्र बोस

चळवळ करा, चळवळ करा, अखंड चळवळ करा.

     -दादाभाई नौरोजी







असे महापुरुष मरत नसतात, त्यांच्या कार्याच्या रूपाने ते अमर झालेले असतात.-महात्मा गांधी(टिळकांबद्दल हे उदगार काढले )


लोकमान्य टिळकांइतकीच शिक्षा मिळण्याचा मान मला मिळाला हा मी माझा बहुमान समजतो.

-महात्मा गांधी


मी भाकरी मागायला आलो आणि माझ्या पदरात दगड टाकले.  महात्मा गांधी







 भारत मुक्त झाला की मानवता मुक्त झालीच. - नेताजी सुभाषचंद्र बोस


 जिच्या हाती पाळण्याची दोरी,ती जगाते उद्धारी.  महात्मा फुले


 विद्येविना मती गेली l

 मती विना नीती गेली l

 नीतीविना गती गेली l

 गतीविना वित्त गेले l

वित्ताविना शूद्र खचले l

इतके अनर्थ एका अविद्येने केले l

( शेतकऱ्यांचा आसूड)


 शिका, संघटित व्हा,संघर्ष करा.

-डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर


 देशाच्या स्वातंत्र्यासाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लढले पाहिजे.

      -डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर








 इष्ट असेल ते बोलणार व शक्य असेल ते करणार.- गोपाळ गणेश आगरकर


 भित्रे लोक त्यांच्या मरणापूर्वीच अनेक वेळा मारतात.

                   - शेक्सपियर

 जय जवान जय किसान जय विज्ञान.                       -अटल बिहारी वाजपेयी





 



Friday, January 28, 2022

Behind My Makeup : An Inspirational Story

 .


  *कलेक्टर मेकअप का करत नाहीत...❓*


*मलप्पुरमच्या जिल्हाधिकारी श्रीमती.  राणी सोयमोई यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधला*.

  ....................................


तिने घड्याळाशिवाय कोणतेही दागिने घातले नव्हते.सगळ्यात जास्त आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिने फेस पावडर देखील वापरली नाही.

   

भाषण इंग्रजीत आहे.  ती फक्त एक-दोन मिनिटेच बोलली, पण तिचे शब्द दृढनिश्चयाने भरलेले होते.

  त्यानंतर मुलांनी जिल्हाधिकाऱ्यांना काही प्रश्न विचारले.


  *प्रश्न: तुझे नाव काय आहे?*


  माझे नाव राणी आहे.  सोयामोई हे माझे कौटुंबिक नाव आहे.  मी झारखंडची रहिवासी आहे.


  *अजून काही विचारायचे आहे?.*


प्रेक्षकांमधून एक सडपातळ मुलगी उभी राहिली.

  विचार, मुली.


 "मॅडम, तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर मेकअप का वापरत नाही?"


कलेक्टरचा चेहरा अचानक फिका पडला.  तिच्या पातळ कपाळावर घाम फुटला.  तिच्या चेहऱ्यावरचे हसू ओसरले.  श्रोते अचानक शांत झाले.


तिने टेबलावरची पाण्याची बाटली उघडली आणि थोडे प्यायले.  मग तिने मुलाला बसायला इशारा केला. मग ती हळूच बोलू लागली.


मुलाने गोंधळात टाकणारा प्रश्न विचारला.  एका शब्दात उत्तर देता येणार नाही, अशी गोष्ट आहे.  उत्तरात मला माझी जीवनकथा सांगायची आहे.  माझ्या कथेसाठी तुम्ही तुमचे मौल्यवान दहा मिनिटे बाजूला ठेवण्यास तयार असाल तर मला कळवा.


  तयार ...


 माझा जन्म झारखंडच्या आदिवासी भागात झाला.


 कलेक्टरने थांबून प्रेक्षकांकडे पाहिले.


*माझा जन्म कोडरमा जिल्ह्यातील आदिवासी भागातील "अभ्रक" खाणींनी भरलेल्या एका लहानशा झोपडीत झाला*.


माझे वडील आणि आई खाण कामगार होते.  मला वर दोन भाऊ आणि खाली एक बहीण होती.  आम्ही एका छोट्या झोपडीत राहायचो जिला पाऊस पडला की गळती व्हायची.


माझ्या पालकांनी तुटपुंज्या पगारावर खाणीत काम केले, कारण त्यांना दुसरी नोकरी मिळत नव्हती. हे एक अतिशय गोंधळाचे काम होते.


मी चार वर्षांची असताना माझे वडील, आई आणि दोन भाऊ विविध आजारांनी अंथरुणाला खिळून होते.


खाणीतील प्राणघातक अभ्रक धूळ चा श्वास घेतल्याने हा आजार होतो, हे त्यांना त्यावेळी फारसे माहीत नव्हते.


मी पाच वर्षांची असताना माझ्या भावांचा आजाराने मृत्यू झाला.


एक छोटा उसासा टाकून कलेक्टरने बोलणे थांबवले आणि तिने अश्रूंनी भरलेले डोळे बंद केले.


बहुतेक दिवस आपल्या आहारात पाणी आणि एक-दोन भाकरी असायच्या. माझ्या दोन्ही भावांनी तीव्र आजार आणि उपासमारीने हे जग सोडले.  माझ्या गावात डॉक्टरांकडे किंवा शाळेत जाणारे लोक नव्हते.  वीज नसतानाही, शाळा, दवाखाना किंवा शौचालय नसलेल्या गावाची तुम्ही कल्पना करू शकता का?  


एके दिवशी जेव्हा मला भूक लागली, तेव्हा माझ्या वडिलांनी माझ्या सर्व कातडे आणि हाडासह पकडून, मला एका मोठ्या खाणीत ओढले, ज्यात नालीदार लोखंडी पत्रे होते.ही एक अभ्रक खाण होती, जी कालांतराने प्रसिद्ध झाली. ही एक प्राचीन खाण आहे, जी अंडरवर्ल्डमध्ये खणली गेली होती. माझे काम तळाशी असलेल्या छोट्या गुहांमधून रेंगाळणे आणि अभ्रक धातू गोळा करणे, हे होते.  हे फक्त दहा वर्षांखालील मुलांसाठी शक्य होते.


आयुष्यात पहिल्यांदाच मी भाकरी खाल्ली आणि पोट भरले.  पण त्या दिवशी मला उलट्या झाल्या.


*मी इयत्ता पहिलीत असताना, मी विषारी धूळ श्वास घेत, अशा अंधाऱ्या खोल्यांमधून अभ्रक हुंगत होते*.


अधूनमधून भूस्खलनात आणि अधूनमधून काही जीवघेण्या आजारांनी दुर्दैवी मुलांचा मृत्यू होणे, असामान्य नव्हते. 


 जर तुम्ही दिवसाचे आठ तास काम केले, तर तुम्हाला किमान एक भाकरी मिळेल. भूक आणि उपासमार यामुळे मी दररोज हडकुळी आणि निर्जलित ( शरीरात पाणी नसलेली) होत होते.


एका वर्षानंतर माझी बहीणही खाणीत कामाला जाऊ लागली.  मी थोड बर होताच, माझे वडील, आई, बहीण आणि मी एकत्र काम केले आणि आम्ही अशा ठिकाणी आलो, जिथे आम्ही उपाशी राहू शकलो नाही.


पण नशिबाने दुसर्‍याच रूपाने आम्हाला पछाडायला सुरुवात केली होती.  एके दिवशी खूप ताप आल्याने, मी कामावर जात नसताना  अचानक पाऊस आला.  खाणीच्या पायथ्याशी कामगारांसमोरच खाण कोसळून शेकडो लोकांचा मृत्यू झाला.  त्यात माझे वडील, आई आणि बहीण होते.


*जिल्हाधिकाऱ्यांच्या दोन्ही डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.  प्रेक्षकांमधील प्रत्येकजण श्वास घेण्यासही विसरला. अनेकांचे डोळे भरून आले*.

 

माझ्या हे लक्षात आहे की, मी त्यावेळी फक्त सहा वर्षांची होते.


अखेर, मी शासकीय आगती मंदिरात पोहोचले.  तिथंच माझं शिक्षण झालं.  मुळाक्षरे शिकणारी, मी माझ्या गावातून पहिली होते. शेवटी, मी कलेक्टर तुमच्या समोर आहे.


 मी मेकअप वापरत नाही, हे आणि याच्यात काय संबंध आहे ? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.


ती प्रेक्षकांकडे नजर टाकत पुढे सांगू लागली,


तेव्हाच मला समजले की, त्या दिवसांत अंधारातून रेंगाळताना मी गोळा केलेला संपूर्ण अभ्रक मेकअप उत्पादनांवर वापरला जात होता.


 अभ्रक हा फ्लोरोसेंट सिलिकेट खनिजाचा पहिला प्रकार आहे.


*बर्‍याच मोठ्या कॉस्मेटिक कंपन्यांनी ऑफर केलेल्या मिनरल मेकअपमध्ये, सर्वात रंगीबेरंगी बहु-रंगीत अभ्रक आहेत, जे 20,000 लहान मुलांचा जीव धोक्यात घालून तुमची त्वचा चमकवतात*.


*गुलाबाची कोमलता त्यांच्या जळलेल्या स्वप्नांसह, त्यांचे उध्वस्त आयुष्य आणि खडकांमध्ये चिरडलेले त्यांचे मांस आणि रक्त आपल्या गालावर पसरते*.


आपले सौंदर्य वाढवण्यासाठी,

लाखो डॉलर किमतीचे अभ्रक अजूनही खाणीतून लहान मुलांच्या हातांनी उचलले जाते. 


 *आता तुम्हीच सांगा*,


मी माझ्या चेहऱ्यावर मेकअप कसा लावू?.  उपासमारीने मरण पावलेल्या माझ्या भावांच्या स्मरणार्थ मी पोटभर कसे जेवू शकते?  नेहमी फाटलेले कपडे घालणाऱ्या माझ्या आईच्या आठवणीत मी महागडे रेशमी कपडे कसे घालू?.


*तोंड न उघडता डोके वर करून, एक छोटेसे स्मितहास्य करून ती बाहेर पडताना नकळत सारे प्रेक्षक उभे राहिले. त्यांच्या चेहऱ्यावरचा मेकअप डोळ्यांतून टपकणाऱ्या गरमाश्रूंनी भिजू लागला होता*.

  ....................................


स्त्रिया फेस पावडर, क्रीम, लिपस्टिकने भरलेले पाहून त्यांच्यापैकी काहींना किळस आली, तर त्यांना दोष देऊ नका.


(झारखंडमध्ये अजूनही उच्च दर्जाचे अभ्रक उत्खनन केले जाते. 20,000 हून अधिक तरुण मुले शाळेत न जाता तेथे काम करतात. काही भूस्खलनाने गाडले गेले आहेत, तर काही रोगामुळे मृत्यू पावले आहेत. )



Thursday, January 20, 2022

राज्यातील शाळा पुन्हा सुरु





राज्यातील इयत्ता 1 ली ते 12 वीचे वर्ग सोमवार पासून नियमित सुरु करण्याचे राज्याच्या शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. पत्रकार परिषदेतील महत्वपूर्ण माहिती खालील प्रमाणे .


  1.  राज्यातील सर्व माध्यमाच्या इयत्ता 1 ली ते 12 वीचे वर्ग असल्याला सर्व शाळा सुरु. 
  2.  याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला 
  3. जिथे रुग्ण संख्या कमी तिथे नियमित शाळा 
  4. शिशु वर्गही सुरु करण्यास परवानगी 
  5. शाळेत कोविड - 19 संदर्भात योग्य ती काळजी घेऊन शाळा सुरु कराव्यात. 

Monday, January 17, 2022

डॉ. एन. डी. पाटील





*महाराष्ट्रातील परिवर्तनवादी चळवळीचे मार्गदर्शक उपेक्षित वंचित वर्गाचे आधारवड पुरोगामी विचारांचे लढवय्ये नेतृत्व डाॕ.एन डी पाटील सर हे महाराष्ट्राला पोरके करून गेले त्यांच्या कार्याचा आढावा घेणारा लेख*

*पुरोगामी विचारांचे वादळ -डाॕ.एन.डी पाटील सर* 

             *प्रा .डॉ.एन. डी.पाटील सर .९४ वर्षाचा तरुण योद्धा, एकाच किडनी वर लढणारे, मधुमेहाशी सामना करणारे, खुब्याचा सांधा दोन वेळा शस्त्रक्रिया करून बदललेला असतानाही अखंड महाराष्ट्रभर अविरत प्रवास करणारे,देशभरातील वेगवेगळ्या लढ्यांना पाठबळ देण्यासाठी तेथे पोहोचणारे,आपल्या पहाडी वक्तृत्वाने आंदोलनात ऊर्जा पेरणारे,समाजातील उपेक्षित, वंचितांच्याठाई आंतरिक उमाळा जपत त्यांच्यासाठी लढणारे,अन्यायाविरुद्ध पेटून उठणारे, शेतकरी कामगार पक्षाकरिता आपली व्यक्तिगत मिळकत खर्च करणारे,रयत शिक्षण संस्था हा माझा प्राण आहे आणि जीवात जीव असेपर्यंत रयतचे हितच जोपासत राहणार या दृढ संकल्पसह रयत शिक्षण संस्थेच्या हितासाठी आयुष्य वेचणारे,आपल्या तत्त्वांवर निष्ठा ठेवून कधीही तत्वांशी तडजोड न करता प्रामाणिक आयुष्य जगणारे,शुद्ध चारित्र्याचे, निर्भीड मनोवृत्तीचे,कणखर बाण्याचे एक उत्तुंग आणि अफाट व्यक्तीमत्व.*

         *ज्यांनी स्वतःची वेगळी वाट निवडली आणि याच वाटेवर ते चालत राहिले. विशेषता सामान्य माणसं मळलेल्या वाटेवरून प्रवास करतात कारण त्यांना हा प्रवास सुरक्षित आणि सुलभ वाटतो तर असामान्य माणसे मात्र स्वतःच्या वेगळ्या वाटा निर्माण करतात. त्यांना माहित असतं हा प्रवास खडतर आहे, पाय रक्तबंबाळ करणारा आहे,आपल्या सहनशक्तीची परीक्षा घेणार आहे.तरीही ते हा प्रवास आनंदाने करतात.स्वतःच्या वेगळ्या वाटेवरचे आनंदयात्री म्हणजे डॉ. एन डी पाटील सर. यांनी वाटेतले काटे कुठे दूर केले, स्वतःच्या हिकमतीने खाच-खळगे भरले, वळण वाटा सरळ केल्या, त्यांची ही वाट गोरगरिबांसाठी, समाजातील 'नाही रे 'वर्गासाठी आहे. त्यांची ही वाट ,वाटेवरचा प्रवास, प्रवासातील सांगाती,प्रवासातील अनुभव फारच विलक्षण आणि प्रेरणादायी आहे हा प्रवास जाणून घेऊया नारायण.*

      *नारायण ज्ञानदेव पाटील तथा एन डी पाटील साहेब यांचा जन्म ५ जुलै १९२९ रोजी सांगली जिल्ह्यातील ढवळी या गावी झाला.त्यांचे चौथीपर्यंतचे शिक्षण ढवळी येथे झाले. यावेळी पांडुरंग धोंडी परीट हे त्यांचे शिक्षक होते. चौथी पास झाल्यानंतर पाचवीसाठी गावापासून चार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बागणी शाळेत त्यांना घातले गेले. ही शाळा सातवी पर्यंत होती. या शाळेचे वैशिष्ट म्हणजे तिथे असणारे काळू सावता माळी हे  शिक्षक.माळी गुरुजींच्या वर सत्यशोधक चळवळीचा प्रभाव होता. ते पुरोगामी व बंडखोर विचारांचे होते. त्यांचा प्रभाव एन.डी. पाटील सर यांच्यावर पडला. पुरोगामी विचारांचं बाळकडू त्यांना येथेच मिळाले. सातवी झाली आता पुढील शिक्षणाचा काय?कारण जवळपास शिक्षणाची सोय नव्हती.गावा पासून आठ किलोमीटरवर आष्ट्यात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेचे हायस्कुल होते .त्या हायस्कूलमध्ये आठवीसाठी प्रवेश घेतला. रयतचा परिसस्पर्श झाला आणि त्यांच्या पुरोगामी विचारांच्या सोनेरी प्रवासास प्रारंभ झाला. शाळेतील वेताळ राव खैरमोडे सरांच्या मुळे वाचनाची सवय लागली. वाचनामुळे चिकित्सक विचार करण्याची वृत्ती अंगी बानू लागली. सत्यशोधक विचारांचे बीज अंतःकरणात रुजू लागलं. त्याला शाळेतील पुरोगामी वातावरणामुळे अधिक बळ मिळू लागले. त्याच्या शाळेत जाणत्या वयात जे संस्कार मिळाले त्यातून त्यांच्या भविष्यातील जीवनाचा पाया मजबूत झाला. मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी कोल्हापूर गाठले.राजाराम महाविद्यालयात प्रवेश घेतला .त्या काळात कोल्हापूर हे राजकीय व सामाजिक चळवळीचे केंद्र होतं .छत्रपती शाहू महाराजांच्या या भूमीत अनेक पुरोगामी चळवळींना जोर धरला होता. राष्ट्र सेवा दल, काँग्रेस, समाजवादी पक्ष, कम्युनिस्ट चळवळी यांचे कार्य मोठ्या प्रमाणात सुरू होतं. सरांचा पिंड हा सामाजिक चळवळीचा असल्याने ते या चळवळीकडे ओढले गेले. त्यांच्या उपक्रमात सहभागी होऊ लागले. त्यावेळी जनसत्ता नावाचं एक साप्ताहिक कोल्हापुरातून निघायचं.चौकात उभे राहून, ओरडून या साप्ताहिकाची विक्री एन डी पाटील सरांनी केली. शिक्षणासोबत सामाजिक कार्यातील सहभाग वाढत गेला. सामाजिक जाणिवांचा परीघ विस्तारत होता. शेती, शेतकरी, कामगार, कष्टकरी यांच्या प्रश्नांबाबत मनात उमाळा दाटत होता. तारुण्याचा जोशाला मनातल्या धगीची साथ मिळत होती. ३ ऑगस्ट १९४७ रोजी शेतकरी कामगार पक्षाची स्थापना झाली. या पक्षाच्या स्थापनेतील नेतृत्वांबद्दल त्यांच्या मनात आदर होता. आपणही समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीसाठी आयुष्य वाहून घ्यायचे असे त्यांनी मनोमन ठरवले. शेतकरी कामगार पक्षाच्या सांगली शाखेच्या स्थापना बैठकीला उपस्थित राहिले. येथूनच त्यांच्या शे का प च्या कार्याला सुरुवात झाली.*

       *ते बी ए उत्तीर्ण झाले. याच वेळी त्यांच्या वडिलांचे आणि भावाचे निधन झाले.अशा वेळी कुटुंबाची आर्थिक जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. या क्षणाला कर्मवीर भाऊराव पाटील पुढे आले आणि त्यांनी सरांना आष्ट्याच्या  ट्रेनिंग कॉलेजमध्ये नोकरी दिली. नोकरी करत करत ते एम ए झाले. पुढे एल एल बी सुद्धा केली. १९५४ साली छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथे प्राध्यापक म्हणून ज्ञानदान करू लागले. १९६०साली इस्लामपूरच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य झाले.१९५९ पासून रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य असणारे एन डी सर  सन १९९० ते २००८ या संस्थेचे चेअरमन होते .२००८ पासून कार्यवाह पदाची जबाबदारी सांभाळत होते. १९६० ते ६६,१९७०  ते ७६ आणि १९७६ ते १९८२ अशी तब्बल १८वर्ष महाराष्ट्र विधानपरिषदेचे आमदार राहिले आहेत. १९७८ते ८० या कालावधीत महाराष्ट्राचे सहकार मंत्री म्हणून कार्य केल आहृ. १९८५ते ९० या कालखंडात ते महाराष्ट्राच्या विधान सभेचे आमदार होते. महाराष्ट्र राज्य सीमा प्रश्न समितीचे सदस्य आणि सीमा चळवळीचे प्रमुख नेते होते. त्यांच्याकडे अंधश्रद्धा निर्मूलन समिती सह अनेक पुरोगामी विचारांच्या संस्थांचे अध्यक्षपद होतं.*

       *मिळालेली सत्ता, मिळालेली पदे ही मिरवण्यासाठी नसून ती सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी आहेत या तत्वज्ञानात सह त्यांचं जगणं होतं. त्यांच्यामुळे अनेक पदांची उंची वाढली आहे. त्यांचे संपूर्ण आयुष्य तत्त्वांची साखळी आहे.जी अखंड होती. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रत्येक पैलू आपणा सर्वांसाठी दीपस्तंभासारखी आहेत.ज्यायोगे आपण आपलं आयुष्य समृद्ध बनवू शकतो.*

         *अखंड वाचन,सखोल अभ्यास,निरंतर चिंतन आणि मनन यामुळे प्रत्येक विषयाबाबत त्यांची स्वतःची मते होती.त्यांच्या चिंतनाचा, मननाचा गाभा हा सामान्य माणूस होता. समाजातील 'नाही रे'वर्गाबाबत त्यांच्या मनात कणव होती. जागतिकीकरणामुळे या 'नाही रे' वर्गातील माणसं परिघाच्या बाहेर फेकली जात आहेत याचे शल्य त्यांच्या मनात नेहमीच होत.शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासाची त्यांची निश्चित अशी भूमिका होती. विकासाची उंची वाढण्यापेक्षा त्याचा पाया विस्तारला पाहिजे,सामान्य माणूस हा विकासाचा केंद्रबिंदू असला पाहिजे, त्याच्या सामाजिक उन्नतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न झाले पाहिजेत ,या विचारांचा ते सातत्याने उद्घोष करायचे.विचारांच्या या बैठकीमुळे एन डी पाटील सरांचे वक्तृत्व हे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरायचे. त्यांच्या सरांच्या अमोघ वक्तृत्वाची अनेकांना भुरळ पडायची.*

          *शब्द हे शब्द असतात पण जेव्हा शब्दांना तत्वांचा स्पर्श होतो, आचारांचे बळ मिळतं तेव्हा ते शब्द शब्द राहत नाहीत तर ते शब्द अस्त्र बनतात.जे समाजातील अन्यायावर प्रहार करतात,हेच शब्द अनेकांना संघटित होण्याचे, लढण्याचे बळ देतात.सरांच्या  शब्दांनी उपेक्षित, वंचित, पददलितांच्या चळवळींना  संघर्षांची प्रेरणा आणि ऊर्जा दिली आहे. त्यांच्या पहाडी आवाजाने हतबल झालेली ,आत्मविश्वास गमावलेली सामान्य माणसं लढण्यासाठी सज्ज व्हायची, उपाशीपोटी लढत राहायची आणि जिंकायची सुद्धा. सरांच्या शब्दांच्या जोरावर अनेक चळवळींचा लढ्यांना यश मिळाले आहे.आंदोलन आणि सरांचे भाषण एक सूत्र होतं. ते आपल्या धीरगंभीर आवाजाने श्रोत्यांचे चित्त वेधून घ्यायचे, हलक्याफुलक्या विनोदानं वातावरण हलकं फुलकं करायचे ,सर्वस्पर्शी विवेचनातून ऐकणाऱ्यांना विचार करायला भाग पाडायचे. दैनंदिन जीवनातील उदाहरणे आणि दाखले देऊन श्रोत्यांच्या हृदयाला हात घालायचे, त्यांचा आतला आवाज जागा करायचे आणि आपल्या वाणीतून अपेक्षित इप्सित साध्य करून घ्यायचे. सरांचे भाषण हे कधीच मनोरंजनासाठी नसायं तर आत्म चिंतनासाठी असायचं. त्यांचे शब्द श्रोत्यांना रक्तबंबाळ करायचे नाहीत, कोरडे पेटवण्याचा उद्योग करायचे नाहीत तर संघर्षासाठी पेटून उठवण्याचे काम करायचे. त्यामुळेच त्यांच्या शब्दांनी सर्व सामान्यांच्या मनात न्यायासाठी लढण्याची ,झुंजण्याची प्रेरणा दिली आहे.*

               *त्यांच्या भाषणाचे अनेक असे प्रसिद्ध आहेत त्यातील एक किस्सा*      

        *१९७७  साली लोकसभा निवडणुकीत शे का पक्षाचे उमेदवार दाजीबा देसाई यांची प्रचार सभा कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौकात होती. लाखभर लोकांनी बिंदू चौक खचाखच भरला होता. या सभेचे प्रमुख पाहुणे माननीय शरदचंद्रजी पवार साहेब होते. ते रात्री नऊ वाजता भाषणासाठी उपस्थित राहणार होते. रात्रीचे नऊ वाजले तरी ते आले नाहीत.समोर लोकांची तुडुंब गर्दी, लोकांना पवार साहेब येईपर्यंत खेळवून ठेवणं गरजेचं होतं. तात्पुरता बदली खेळाडू म्हणून एन डी  पाटील सरांच्या कडे माईक सुपूर्द करण्यात आला.एन डी सरांनी  आपल्या फटकेबाजीला सुरुवात केली. नऊ चे दहा झाले, दहाचे अकरा ,अकरा चे बारा असे करत करत पहाटेचे तीन वाजले. पहाटे तीन वाजता पवार साहेब सभास्थळी आले. नऊ ते तीन तब्बल सहा तास एन डी पाटील सर बोलत होते.या कालावधीत एकही माणूस जागचा हलला नाही. यातून सरांचा अभ्यास ,व्यासंग'वक्तृत्वा ची पकड आणि सहा तास बोलण्यासाठी आवश्यक असणारी शारीरिक सुदृढता याची साक्ष पटते. त्या दिवशी त्यांच्या अमोघ वाणीनं बिंदू चौकात एक नवा इतिहास घडविला.*

              *सरांचा आणखी एक गुण अधोरेखित करावा वाटतो तो म्हणजे त्यांचे स्वाबलंबन. एन डी पाटील सर स्वतःची अनेक कामे स्वतः करत. छोट्या छोट्या कामांसाठी इतरांवर अवलंबून राहणे त्यांना आवडत नसायचे.ते सहकार मंत्री असताना घडलेला प्रसंग .सावंत नावाचे त्यांचे सहकारी त्यांना भेटायला गेले होते. यावेळी रूम मध्ये कोणीच नव्हतं पण बाथरूम मधून कपडे धुण्याचा आवाज येत होता. काही वेळानं एन डी पाटील सर बाहेर आले. पण या सावंतानी काही विचारण्यापूर्वीच ते बोलू लागले' "अहो सकाळपासून कोणीच भेटायला आलेले नाही .मी एकटाच आहे. चला आपलं काम उरकून घेऊ म्हटलं' निवांतपणे कपडे धुतले.*"

       *महाराष्ट्राचे सहकार मंत्री स्वतःचे कपडे स्वतः धूत  होते ,हे सावंत यांना सुद्धा स्वप्नवत वाटलं असेल. एन डी पाटील सर नेहमीच स्वतःचे कपडे स्वतः धूवायचे. तेही स्वच्छ आणि चकचकीत.*

      *त्यांच्याकडे नेहमीच कमीत कमी ड्रेस असायचे. गरजा मर्यादित ठेवायच्या या त्यांच्या विचारानुसार त्यांचं वर्तन होतं. त्यांच्या गाडीतील बॉक्समध्ये सुई, दोऱ्याची गुंडी, शर्टची बटनं ,ब्लेडचे अर्ध पातं, सिसपेन्सिल खोडरबर ,काचेची छोटी पट्टी, साधे पेन, टाचण्या हे साहित्य नेहमी असायचं. यातून त्यांचा बारकावा सुद्धा लक्षात येतो*.

          *'माणसाला जगायला किती आणि काय लागतं' हा त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन.माणसांने आपल्या गरजा विनाकारण वाढवायच्या नाहीत. मर्यादित गरजांमध्ये आपण आनंदाने जगायचं हे त्यांचं तत्त्व. अत्यंत काटकसर करून मजेत कसं जगता येतं हे त्यांनी दाखवून दिले. या संदर्भातील काही प्रसंग*

     🔹 *आष्ट्यातील शिक्षकाची नोकरी सोडली आणि ते गिरणी कामगार युनियनचे सेक्रेटरी झाले. या पदासाठी त्यांना महिन्याला 45 रुपये जीवन वेतन मिळायचं एवढ्या रकमेत दोन वेळचं जेवण शक्य नाही हे ओळखून ते एक वेळ जेवायचे आणि एक वेळ मिसळ किंवा वडा पाव खायचे. आपल्याला एक वेळ वडापाव खावा लागतो याचं त्यांना कधीच वाईट वाटलं नाही तर किमान एक वेळ जेवायला मिळतं याचं समाधान वाटायचं*. 

          🔹 *आपली संपूर्ण मिळकत शे का  पक्षासाठी खर्च करणाऱ्या एनडी सर नेहमी आपल्या कार्यकर्त्यांचा विचार करायचे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते झाल्यावर त्यांचं मानधन 300 वरून अठराशे रुपये झाले.पंधराशे रुपयांची वाढ झाली. वाढलेली ही रक्कम ते आपल्या सोबतच्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या खर्चासाठी वाटायचे आणि त्याच्या नोंदी नोंदवहीत ठेवायचे. नेता कसा असावा याचे हे आदर्श उदाहरण.*

         *साधेपणा तर सरांच्या नसानसात भिनला होता.*

          🔹 *आमदार असतानाही एसटीतून प्रवास करताना गर्दीमुळे बसायला जागा नसेल तर ते उभे राहून प्रवास करायचे*

          🔹 *मुंबईमध्ये आमदारांसाठी घरे देण्यात आली पण काही कोटी रुपयांचे मुंबईतील घर सुद्धा त्यांनी नाकारले.*

         🔹 *ते रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष होते, सध्या कार्यवाह पदाची जबाबदारी होती. संस्थेच्या कामासाठी सतत दौरे सुरू असायचे; पण ड्रायव्हरचा खर्च सोडता सर्व खर्च स्वतः करायचे संस्थेकडून कसलेही मानधन त्यांनी घेतले नाही.*

     🔹 *मंत्रीपद मिळाल्यानंतर लाल दिव्याची गाडी त्यांनी नाकारली*

      🔹 *मुंबईत शासकीय निवासस्थान नाकारून स्वमालकीच्या 350 चौरस फुटाच्या घरांमध्ये पंचवीस वर्षे राहिले*. 

       🔹  *त्यांना कोल्हापुरात मानाचा शाहू पुरस्कार मिळाला. पुरस्काराची रक्कम 51000 होती. या रकमेमध्ये स्वतःचे 5000 घालून ती रक्कम त्यांनी रयत शिक्षण संस्थेला दिली*.

            *असे अनेक प्रसंग आहेत जे त्यांच्या मनाच्या श्रीमंतीची साक्ष देतात.*

         *त्यांनी आजपर्यंत अनेक मानाची पदे भूषवली पण यातील कोणत्याही पदाचा  वापर स्वतःसाठी, स्वतःच्या कुटुंबाच्या फायद्यासाठी केला नाही. माझी प्रतिष्ठा ही समाजाने दिलेली आहे. मिळालेली प्रतिष्ठा ही कोणीही आपली खाजगी बाब मानू नये,अगदी मी, माझ्या मुलांनी, नातवंडांनी सुद्धा. त्यामुळे या प्रतिष्ठेचा वापर किंवा उपयोग खासगी कारणासाठी कोणी करून घेऊ नये. कारण ही समाजाने दिलेली असल्यामुळे त्याचा वापर समाजासाठी झाला पाहिजे हे त्यांचे विचार आणि या विचारानुसार असेच त्यांचे आचार.आपल्या पदाचा, प्रतिष्ठेचा,अधिकारांचा वापर त्यांनी कधीच स्वतःच्या किंवा कुटुंबाच्या फायद्यासाठी केला नाही.*

              *त्यांच्या मोठ्या चिरंजीवाला मेडिकलला जायचं होतं पण एक दोन मार्क र् कमी पडत होते.त्यावेळी एन डी  पाटील सर सहकार मंत्री होते, मामा शरदचंद्र पवार साहेब मुख्यमंत्री पण यापैकी कोणत्याही ही वशिल्याचा वापर केला नाही. मेडिकलला सोडचिठ्ठी देऊन इंजिनिअरिंग कडे जावे लागले ,तोही प्रवेश नागपुरात .ठरवलं असतं तर सांगलीच्या वालचंद कॉलेजच्या राखीव जागेवर ऍडमिशन घेता आलं असतं पण मेरीट नुसार नागपूरला मिळाले, त्यांच्या चिरंजीवांनी कोणतीही कुरबूर न करता आपलं शिक्षण नागपूरमध्ये पूर्ण केले, वडिलांचा विचार कृतीमध्ये उतरवणारे त्यांचा चिरंजीवही तितकेच ग्रेट.*

       *विचारांची पक्की बैठक, आपल्या तत्वांवर अढळ निष्ठा, त्यागी आणि समर्पित जीवन ,प्रामाणिक आणि निरपेक्ष प्रयत्न ,निर्भीड आणि निर्भय स्वभाव या जोरावर एनडी पाटील सरांनी अनेक लढ्यांना बळ दिले. झुंडशाही, एकाधिकारशाही, पैसा ,सत्ता किंवा मदमस्त गुंडगिरीशी दोन हात करण्याची धमक आणि जिगर असणारे हे लढवय्ये सेनापती शोषितांचे नेते होते. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलनं यशस्वी झाली.*

      ▪️ *एनराॕन विरुद्धचा लढा* 

      ▪️ *रायगडमधील शेज विरुद्ध चे आंदोलन*

      ▪️ *वीज दरवाढीविरोधात आंदोलन*

      ▪️ *सीमावासियांसाठी सुरू असलेला लढा*

      ▪️ *कोल्हापुरातील टोलविरोधी आंदोलन*

*अशा अनेक आंदोलनांचं नेतृत्व करत, सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचे काम एन डी  पाटील सरांनी केलेलं आहे .वयाच्या नव्वदीत नंतर सुद्धा ते रस्त्यावरची लढाई लढत होते.*

           *आज एन डी पाटील सर आपल्यातून निघून गेलेत; पण एनडी पाटील सर यांचे विचार,त्यांनी उभारलेले लढे त्यांचे कार्य हे आपल्याला सदैव प्रेरणा देत राहील.एन डी पाटील सर यांनी शोषितांच्यासाठी ,वंचितांच्यासाठी जे कार्य केलं ,समताधिष्ठित समाजाच्या रचनेसाठी जे लढे उभारले, तत्वांशी तडजोड न करता आदर्श जीवन कसा असावा याचा वस्तुपाठ निर्माण केला. सरांनी पेरलेल्या या विचारांवरच चालत राहून आपणही सामाजिक जीवनात वावरताना कृतिशील रहावं हीच एन डी पाटील सर यांना कार्यांजली ठरेल*.

  या क्षणी गुरु ठाकूर यांच्या ओळी आठवतात

*करुन जावे असेही काही दुनियेतुनी या जाताना*

*गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट घेताना* 

*क्षण कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर* 

*असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर*

✍️ *आदरणीय एन डी पाटील सरांच्या विचारांवर व कार्यावर प्रेम करणारा चाहता.*