Showing posts with label मराठी निबंध. Show all posts
Showing posts with label मराठी निबंध. Show all posts

Sunday, January 15, 2023

'माझी आई 'मराठी भाषण / निबंध





"स्वामी तिन्ही जगाचा,

आईविना भिकारी"

       सुवासिकता,सुंदरता आणि सु कोमलता या गुणांनी गुलाबाला मनोवेधकता प्राप्त होते.ध्रुवाची निश्चलता, निर्धारितता आणि नेत्रदीपकता त्याला अढळ स्थान मिळवून देत असते. गंगेचे पावित्र्य, परंपरा व परोपकारिता तिच्या पदरी पुण्याई बांधीत असते. आईचेही अगदी तसेच आहे.

 "आई तुझी माया आभाळाएवढी, तुझ्या ममतेत पंच अमृताची गोडी."

 आईविना मन छिन्न आहे, जीवन सुन्न आहे आणि गजांत लक्ष्मी असलेले वैभव देखील शून्य आहे. म्हणूनच कवी यशवंत म्हणतात... "स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी".

 आई एक विद्यापीठ आहे. सत्ता, मत्ता, विद्वत्ता हे सारे या जन्मदेपुढे कनिष्ठ आहेत.म्हणून तर जगतज्जेत्या सिकंदरालाही मातेची ओढ लागली होती. कुणापुढेही न वाकलेला,न झुकलेला व जग जिंकण्याची महत्त्वाकांक्षा असणारा सिकंदर आई पुढे नतमस्तक झाला होता. हिंदवी स्वराज्य निर्माण करणारे शिवाजी महाराजांच्या जीवनात आईला सर्वश्रेष्ठ स्थान आहे.

 आई मुलाला जन्म देते.सर्वस्वी परावलंबी असणाऱ्या बाळाला नयनांचा दिवा आणि हाताचा पाळणा करून वाढवते. त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करते. चार घर हिंडून भाकर तुकडा गोळा करून आणणारी भिकारीण सुद्धा स्वतः उपाशी राहते व आपल्या लेकराला ओला-कोरडा घास भरवते. आई आपल्या बाळासाठी प्रसंगी प्राणांची बाजी लावते,हे आपल्याला इतिहासातील हिरकणीने दाखवून दिले आहे. कुंभार मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून निर्जीव मूर्ती घडवतो. पण आई मात्र जिवंत गोळ्याला आकार देऊन त्याच्या कोऱ्या पाठीसारख्या संवेदनशील मनावर सुसंस्कार करते.म्हणूनच महात्मा गांधीजी म्हणत की,'एक माता शंभर शिक्षकांपेक्षा श्रेष्ठ आहे.' आईचा प्रेमभाव सर्वत्र सारखाच असतो. त्यात गरीब-श्रीमंत, श्रेष्ठ- कनिष्ठ असा भेदभाव नसतो. मातेच्या प्रेमात दिक्कालाच्या अडचणी नसतात.आईच्या महतीचे वर्णन इंद्रदेवही करू शकत नाही.

 "शब्द शोधण्यास निरोप स्वर्गात धाडले,

नाही सापडत म्हणून देवेंद्रानेही कर जोडले."

 मातेमुळे आपणास विश्वाचे दर्शन घडते.तिच्याशिवाय या जगात माझे, आपले म्हणावे असे कोणीच नाही.आईचे हृदय सागरासारखे विशाल असते. आपल्या चिमण्या पाखरांसाठी ती अपार कष्ट घेते आणि आपल्या बाळांच्या मधून एक संस्कारक्षम पिढी निर्माण करते.

      जगाच्या पाठीवर एकच न्यायाचे महान मंदिर आहे ते म्हणजे आई. जेथे मुलाचे सर्व दुर्गुण माफ होतात. म्हणूनच 'आई' या दोन अक्षरी शब्दाने संपूर्ण विश्वाला मोहिनी घातली आहे. आईसारखे दुसरे दैवत नाही. म्हणून कुंतीपुत्र कर्णाला राधेने आपलेसे केले.देवकी पुत्र श्रीकृष्णाला यशोदेने ममता दिली व आपल्या देवत्वाची प्रचिती आणून दिली.

 आई खरंच काय असते याचे यथार्थ वर्णन करताना कवी फ. मु. शिंदे म्हणतात...

 "आई खरंच काय असते?

 लेकराची माय असते,

 वासराची गाय असते,

दुधाची साय असते,

 लंगड्याचा पाय असते.

आई असते जन्माची शिदोरी

सरतही नाही अन उरत ही नाही.

 शेवटी मी एवढेच म्हणेन....

 "रक्ताच्या नात्यापेक्षा दुधाचे नातं महान असतं.

म्हणून आई या शब्दापुढे सारं जग लहान असतं!"

धन्यवाद!




Thursday, January 12, 2023

मकर संक्रांत सणाविषयी मराठी माहिती / निबंध




 मकर संक्रांत

या सणाविषयी मराठी निबंध / मराठी माहिती


     'तिळगुळ घ्या, गोड बोला' असे म्हणून एकमेकांच्यातील भांडण, कटूता विसरण्याचा सण म्हणजे,मित्रांनो, तुमच्या लक्षात आलेच असेल. होय, तो सण म्हणजे 'मकर संक्रांत'. इंग्रजी वर्षाप्रमाणे जानेवारी महिना म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात. याच महिन्यात येणारा हा सण. सूर्य या दिवशी मकरवृत्तात प्रवेश करतो. म्हणून या सणाला 'मकर संक्रांत' हे नाव पडले. आर्यांच्या काळापासून म्हणजेच प्राचीन काळापासून हा सण साजरा केला जात आहे.

      प्रत्येक सणामागे काही ना काही पौराणिक कथा असतातच. तशीच या सणाबाबतही कथा सांगितली जाते. संक्रांती नावाची देवी होती. तिने या दिवशी शंकासुराचा वध केला.ही देवी लांब ओठ, मोठे नाक,नऊ हात असलेली. ही देवी प्रसन्न नाही की, मंगलदायक नाही. तिचे वाहन, वस्त्र व अलंकार वेगवेगळे असतात.या वस्त्र व अलंकारांच्या माध्यमातून ती पुढे येणारे संकट सुचवत असते.ती ज्या दिशेने येते त्या ठिकाणी समृद्धी येते आणि ती जिकडे  जाते तिकडे संकट कोसळते. यावरून 'संकट येणे' या अर्थाने 'संक्रांत येणे' हा वाक्प्रचार रूढ झाला आहे.

   या सणानिमित्त तिळगुळ देण्याची पद्धत आहे. काळी वस्त्रे  घालण्याची प्रथा आहे. यामागे विज्ञान दडलेले आहे.हा सण येतो थंडीच्या दिवसात.त्यामुळे शरीराला स्निग्ध व उष्ण पदार्थांची गरज असते.म्हणून तिळगुळ खाण्याची पद्धत आहे.काळे वस्त्र थंडीपासून रक्षण करते म्हणून काळे वस्त्र शुभ मानले आहे.

         या सणाच्या निमित्ताने आपण आपली संस्कृती जपत असतो. सुवासिनी सुगडात बोरे, हरभरा,ऊस,गहू घालून वाणवसा करतात. हळदीकुंकू समारंभ साजरा करून काहीतरी वस्तू भेट देतात.लहान मुलांचे बोरनहान करतात. या साऱ्या निमित्ताने लोक एकत्र येतात.

        दक्षिण भारतात या सणाला 'पोंगल' म्हणतात.आपण संक्रातीच्या आदल्या दिवसाला 'भोगी' म्हणतो. त्या दिवशी तीळ लावून बाजरीची भाकरी, लेकुरवाळी भाजी, कढी,मुगाच्या डाळीची खिचडी असा मस्त बेत करतो. संक्रातीच्या दुसऱ्या दिवसाला किंक्रांत म्हणतात. हा दिवस अशुभ मानतात.

     तेव्हा मित्रांनो लक्षात ठेवा, आपल्या पूर्वजांनी खूप विचार करूनच या सर्व सणांची योजना केली आहे. म्हणून सण साजरा करताना जाणून घ्या आपल्या सणांचे महत्त्व.

Wednesday, January 4, 2023

6 जानेवारी - पत्रकार दिन




 6 जानेवारी -  पत्रकार दिन

" ना खीचो कमान को

  ना तलवार निकालो

  जब तोप मुकाबिल हो

  तो अखबार  निकालो  "

       6 जानेवारी हा 'पत्रकार दिन' म्हणून साजरा केला जातो. समाजातील ज्वलंत प्रश्नावर सडेतोडपणे लिखाण करून समाजात जनजागृती करणारा दूत म्हणून वर्तमानपत्राकडे पाहिले जाते. आज पत्रकार दिन साजरा करत असताना त्या वृत्तपत्रांचा इतिहास सुद्धा पाहणे तितकेच गरजेचे आहे. दर्पण,केसरी, मराठा समाचार जागरण,बंगाल,केसरी, प्रबोधन यासारख्या वर्तमानपत्रांनी स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये लोकांच्या मनामध्ये जागृती केली होती व यातूनच स्वातंत्र्य चळवळीचे वारे वाहू लागले.

     देशाची सेवा करण्यासाठी सीमेवरती सैनिकांची आवश्यकता असते तितकीच गरज देशातील अंतर्गत विभागाचे रक्षण करण्यासाठी उत्तम पत्रकाराची आवश्यकता असते. बाळशास्त्री जांभेकर यांच्या लेखमालेपासून ते नवाकाळच्या खाडीलकरापर्यंत सर्व समकालीन व्यक्तींनी वर्तमानपत्रातून लिखाण करून जनतेपर्यंत उत्तम संदेश पोहोचविण्याचे कार्य केले. पत्रकार दिन साजरा करत असताना आज चांगल्या,उज्वल भविष्य असणारे,जनतेच्या प्रश्नांचा ठाव घेणाऱ्या उत्तम पत्रकारांची निर्मिती होणे गरजेचे आहे.आज ही आम्हाला निर्भीडपणे लिखाण करणारी, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारी व उपेक्षित व वंचितांना मुख्य प्रवाहात आणणारे प्रामाणिक पत्रकार पहावयास मिळतात.

    उत्तम पत्रकार हा समाजाचा दिशादर्शक असतो.वास्तववादी चित्र आपल्या प्रकट लेखणीतून वस्तुस्थिती त्रयस्थपणे मांडण्याचे कार्य करतो. अशाच पत्रकारांची निर्मिती झाली तर यशाचे शिखर गाठता येईल व राष्ट्राच्या जडणघडणीस मदत होऊ शकते.

जय हिंद ! जय भारत !



Tuesday, January 3, 2023

युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज मराठी भाषण





 युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज

 महाराष्ट्रातील विजयनगरचे साम्राज्य नष्ट झाल्यापासून महाराष्ट्राच्या क्षितिजावर स्वातंत्र्यसूर्य उगवलाच नव्हता. महाराष्ट्राची भूमी 300 वर्षे गुलामगिरीच्या अंधारात खितपत पडली होती. अशावेळी शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करून महाराष्ट्राच्या इतिहासात नवा अध्याय निर्माण केला.

      युगपुरुष शिवाजी महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळील शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला. वडील शहाजीराजे यांच्याकडून शौर्याचा वारसा आणि माता जिजाबाईंकडून सुसंस्काराचा अलौकिक वसा शिवबांना लहानपणापासूनच मिळाला. जिजाबाईंनी शिवबांना लहानपणी रामायण महाभारतातील शिवरायांच्या कथा सांगितल्या. म्हणूनच स्वराज्याच्या रूपाने या भूमीवर शिवभारत घडले. आजच्या मातांनी आपल्या मुलांना हे शिवभारत सांगितले तर निश्चितच डॉक्टर कलामांच्या स्वप्नातील व्हिजन भारत साकार झाल्याशिवाय राहणार नाही.

      वयाच्या सोळाव्या वर्षी शिवबांनी रायरेश्वराच्या शिवाला साक्षी ठेवून आपल्या तरुण मित्रांच्या सोबतीने स्वराज्याची शपथ घेतली.अत्यंत कमी वयात शिवबांनी हे अग्नी दिव्य हाती घेण्याचे धाडस केले आणि ते पूर्णत्वास नेले. त्यासाठी त्यांनी पुणे, सुपे, मावळ यासारख्या प्रांतात स्वतः फिरून लोकांची परिस्थिती,त्यांच्या समस्या समजावून घेतल्या आणि हळूहळू लोकांच्या मनामध्ये स्वधर्म आणि स्वराज्य याबद्दल आस्था निर्माण केली.एक कवी म्हणतो...

' माणसांना अस्मितेचे भान यावे लागते,

पाय चाटू श्वापदांनी इन्सान व्हावे लागते.'

या युक्तीप्रमाणे महाराष्ट्रातील माणसांना स्वतःच्या अस्मितेचे भान करून देण्याचे काम शिवरायांनी केले. त्यामुळेच इथल्या माणसांना स्वराज्याचे महत्त्व पटले आणि त्यातूनच तानाजी मालुसरे,येसाजी कंक, बाजी पासलकर,नेताजी पालकर यांसारखी अनेक तरुण मंडळी शिवबांभोवती जमा झाली, आणि याच मावळ्यांनी पुढे स्वराज्याचा गोवर्धन स्वतःच्या हातावर पेलला.

      रणांगणावर योद्धा लढत नसतो,

 त्याचे हात किंवा हातातील समशेर ही लढत नसते,

लढत असते ते फक्त त्याचे मन,

 शिवरायांनी हीच लढणारी मनं घडविण्याचे महान कार्य केले. परकीयांशी लढण्या अगोदर त्यांनी स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त करून स्वराज्याची पायवाट मोकळी केली.

      अफजलखानाचा प्रतापगडावर वध करून स्वराज्यावरील पहिले मोठे संकट शिवरायांनी सहज धुळीस मिळवले.पन्हाळगडावरून केलेली सुटका आणि शाहिस्तेखानाची केलेली फटफजिती यातून शिवाजींनी स्वतःची आणि आपल्या सहकारी मावळ्यांची योजनाबद्धता काळालाही सिद्ध करून दाखवली.औरंगजेब बादशहाच्या कैदेतून अद्भुत सुटका करून घेऊन संपूर्ण भारत वर्षाला हिंदवी स्वराज्याच्या सामर्थ्याची प्रचिती आणून दिली. या आणि अशा अनेक संकटांशी सामना करत करत शिवरायांचे कार्य आणि व्यक्तिमत्त्व दैदिप्यमान बनत गेले.

      शिवरायांनी उभे केलेले स्वराज्य कुणा एकट्या दुकट्याचे नव्हते तर ते संपूर्ण रयतेचे होते. स्वराज्यात सर्व जाती-धर्मातील माणसांना स्थान होते.ब्राह्मण, भोळ्या समजुती आणि परंपरांचे मात्र तेथे उच्चाटन होते.आणि म्हणूनच ते स्वराज्य म्हणजे एक प्रकारचे समाज परिवर्तनच होते.

    समाज परिवर्तनाच्या पायावर उभे असलेले हे राज्य न्यायाचे, नीतीचे, जनतेच्या कल्याणाचे राज्य होते आणि असे राज्य उभे करणारे शिवछत्रपती हे रयतेचे राजे होते.

 धन्यवाद!

Monday, January 2, 2023

छत्रपती शिवाजी महाराज Chhatrapati Shivaji Maharaj apratim bhashan






 युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज

  श्रीपती, भूपती,नृपती,अधिपती, पृथ्वीपती, छत्रपती, कुलवंत, जयवंत,यशवंत,किर्तीवंत, धैर्यशील, सतशील, धर्मशील, प्रजादक्ष, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज छत्रपती  शिवरायांच्या चरणी मानाचा मुजरा!

   नमस्कार, व्यासपीठावरील मान्यवर,व्यासपीठासमोरील तुम्ही सर्व सन्माननीय ज्ञाते, वक्ते आणि रसिक श्रोते हो! माझ्या भाषणाचा विषय लक्षात आला असेल. विषय मांडतोय 'युगपुरुष छत्रपती श्री शिवाजी महाराज'.

 'झाले बहु, होतील बहु,

 परंतु यासम हा!'

 हे वर्णन ज्यांना अगदी तंतोतंत लागू पडते, ते म्हणजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज.आणि म्हणूनच रसिकहो... शेकडो वर्षे उलटून गेली तरी लोकांच्या मनातील महाराजांचे स्थान आढळ आहे. छत्रपती शिवाजी राजांचे 'राजा आणि व्यक्ती' म्हणून कर्तृत्व हे अतुलनीय होते. त्यांचे चरित्र अत्युच्च होते. म्हणूनच त्यांच्या कर्तृत्वाच्या तोफा कालशिलावर अखंड आहेत.म्हणूनच समर्थ रामदास स्वामी म्हणतात'

 "निश्चयाचा महामेरू

 बहुत जनासी आधारू

 अखंड स्थितीचा निर्धारू

 श्रीमंत योगी

धीर उदार सुंदर

 शूर प्रियसी तत्पर

सावधपणे नृपवर

तुच्छ केले

यशवंत किर्तीवंत सामर्थ्यवंत वरदवंत  पुण्यवंत नीतीवंत जाणता राजा

     शिवाजी महाराजांना हे जाणतेपण लाभले ते त्यांच्या मातोश्री जिजाबाई यांच्यामुळेच.

    शिवरायांचा जन्म 1630 मध्ये झाला 1680 साली त्यांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली. म्हणजे अवघे 50 वर्षांचे आयुष्य. पण या अल्पकाळात राजांनी केलेली कामगिरी अपूर्व ठरणारी आहे.या यशाचे श्रेय या योगी पुरुषाच्या कर्तृत्वात आणि महान चारित्र्यात दडलेले आहे.

    शिवनेरी किल्ल्यावर शहाजीराजे भोसले व मासाहेब जिजाऊ यांच्या पोटी या सुपुत्राचा जन्म झाला. मासाहेब जिजाऊंनी या आपल्या असामान्य पुत्राला आपल्या तेजस्वी विचारांचे बोधामृत पाजून परिपक्व केले. शिवाजी राजांचे आजोबा मालोजीराजे व पिता शहाजीराजे हे दोघेही शूर होते. त्यांच्या पराक्रमाचा वारसा शिवरायांना मिळाला.

    महाराजांना मराठा तितुका मिळवून महाराष्ट्र धर्म वाढवायचा होता आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करायची होती.हिंदूंच्या सार्वभौम स्वराज्याची अपेक्षा केली आणि '  हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे! '  या विचाराने प्रेरित होऊन हिंदवी राज्याच्या स्थापनेचा पाया त्यांनी घातला. हेच त्यांचे सर्वश्रेष्ठ जाणतेपण.

 शिवाजी राजांनी महाराष्ट्रात प्रथम स्वराज्याचे बी रुजविण्यास प्रारंभ केला. स्वराज्याची कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी शिवरायांना अतोनात मेहनत करावी लागली आणि या सर्व घडामोडीत शिवरायांच्या वाट्याला दगदगीचे जीवन आले. पण राजांनी कधी माघार घेतली नाही. आदिलशाही निजाम यांच्याबरोबर काही वेळेला स्वकीयांचाही विरोध सहन करावा लागला. कधी शक्तीचा तर कधी युक्तीचा वापर करून त्यांनी आपले स्वराज्याचे स्वप्न साकार केले. महाराजांचे नाव ऐकताच शत्रूच्या गोटात भंबेरी उठत असे.

" या भूमंडळीच्या ठायी

धर्मरक्षी ऐसी नाही

महाराष्ट्र धर्म उरला नाही

 तुम्हाकरिता " 

 या समर्थ रामदास स्वामींच्या वचनात महाराजांच्या पराक्रमाची, अवतार कार्याची माहिती आहे. म्हणूनच अनेक इतिहासकारांनी देखील महाराजांची तुलना अलेक्झांडर, सिझर, नेपोलियन अशा जगप्रसिद्ध सेनानींशी केली आहे. पण महाराज नुसतेच सेनानी नव्हते ते थोर मुत्सद्दी होते. राजकारणाचे रबर तुटेपर्यंत ताणायचे नसते, हे त्यांनी ओळखले होते. म्हणूनच जयसिंगाचे सामर्थ्य लक्षात येताच महाराजांनी माघार घेतली. पण स्वराज्यातील बारा किल्ले व एक लाख होनाचा मुलुख स्वतःकडे ठेवण्यात यशस्वी झाले. खरा यशस्वी कोण तर, जो विजयाचे फलित अधिकाधिक पदरात पाडून घेतो तो व वेळप्रसंगी चार पावले मागे सरतो आणि संधी मिळताच दहा पावले पुढे टाकतो. पराभवात ही आपल्या राज्याचे नुकसान कमीत कमी कसे होईल?  हे पाहतो तो खरा मुत्सद्दी.

   शिवाजी राजे यांचा राजकारणातील जरब पहाल तर आश्चर्याने थक्क व्हाल. आरमारातील दौलतखान व दर्यासारंग यांनी हयगय केल्याचे लक्षात येताच महाराज कठोरपणे लिहितात, " असे नादान थोडे असतील,ऐवज न पाठवून तुम्ही आरमार खोळंबून पाडाल,

एवढी हरामखोरी तुम्ही कराल

 न कळेल तरी ऐसे चाकर आज ठीक केले पाहिजे.

नेमून दिलेल्या कामात कामचुकारपणा करणारा मग तो ब्राह्मण जरी असला तरी महाराज रोखठोकपणे विचारतात, " ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा धरू पाहतो!"

    स्त्रीच्या अब्रूला हात घालणाऱ्याचे हात तोडणारे राजे एकटेच. लाच खाऊन ही जिने जगविता? थू तुमच्या जिनगाणीला!  असे प्रत्यक्ष मामाला उद्देशून म्हणणारे व प्रसंगी त्यांना कैद करणारे देखील महाराज एकटेच. ब्रिटिशांच्या सारखी महासत्ता देखील त्यांच्यापुढे नतमस्तक झालेली दिसते असे.  महाराज म्हणजेच राजे शिवछत्रपती होय.

 महाराजांचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन मातेचा होता. म्हणूनच स्वकीयांची असो वा परकियांची असो. स्त्रीच्या शिलाचे रक्षण करणे व तिला मातेचे स्थान देणे राजे सर्वश्रेष्ठ कर्तव्य मानतात. म्हणूनच सुभेदाराची सून लूट म्हणून समोर उभी असताना...

 " अशीच आमुची आई असती,

 सुंदर,रूपवती,

 आम्हीही सुंदर झालो असतो!

 वदले छत्रपती!"

 अशा नीतिमान युगपुरुषासमोर शतदा नतमस्तक व्हावे.

   रयत म्हणजे आपली प्रजा. हिचा सांभाळ पुत्रवत केला पाहिजे. हीच तळमळ महाराजांच्या ठाई होती. झुंडशाही नष्ट करून राजांनी अशी शिस्त लावली की लुटीतील एखादा सुतळीचा तोडा देखील लपवून ठेवण्याचे धाडस देखील कोण करत नसेल.जुन्या वतनदारांची वतने खालसा करून नवीन ही कोणास देऊ नयेत असे सक्त दंडक राजांनी घातले. सरंजामशाही नष्ट करून, गुणवत्तेप्रमाणे राज्यकारभारात स्थान देऊन,आपले प्रशासन विलक्षण कार्यक्षम ठेवले.या थोर मानवाच्या जीवन चरित्राकडे पाहताना  एवढेच म्हणावेसे वाटते...

" गीतेचा संदेश तू!

आणि क्रांतीचा आदेश तू!

 संस्कृतीचा मान तू!

आणि आमचा अभिमान तू!

 जय हिंद ! जय शिवराय!






Tuesday, December 27, 2022

युगपुरुष : स्वामी विवेकानंद मराठी भाषण /निबंध




युगपुरुष : स्वामी विवेकानंद मराठी भाषण / निबंध 

"ज्ञानवंत तू ! कीर्तीवंत तू ! आढळ तुझे स्थान!

तुझ्या पूजनी विनीत होणे,हाच आमचा सन्मान!"

   ज्यांच्या विचारातून अनेक युगायुगांसाठी प्रकाश निर्माण होत राहील,असे स्वामी विवेकानंद हे थोर युगपुरुष होते.

       विवेकानंदांचा जन्म विश्वनाथ दत्त व भुवनेश्वर देवी या दाम्पत्याच्या पोटी 12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता शहरात झाला. शालेय जीवनात स्वामीजी अत्यंत बुद्धिमान व प्रतिभावान विद्यार्थी म्हणून प्रसिद्ध होते. ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल विचार मंथन चालू असतानाच त्यांची भेट रामकृष्ण परमहंस यांच्याशी झाली आणि त्यांच्याकडूनच विवेकानंदांना दिव्य ज्ञान प्राप्त झाले.

         रामकृष्णांच्या मृत्यूनंतर त्यांचे पवित्र कार्य पुढे चालवण्याची जबाबदारी विवेकानंदांनी आपल्या खांद्यावर समर्थपणे पेलली. कार्याचा प्रचार आणि प्रसार करत त्यांनी भारतभर भ्रमण केले. त्या भ्रमंतीत त्यांना मातृभूमीच्या समस्यांची जाणीव झाली. त्या सोडवण्यासाठी योजनात्मक विचार त्यांनी मांडले.

       1893 मध्ये शिकागो येथे भरलेल्या 'जागतिक सर्वधर्म परिषदेमध्ये' स्वामी विवेकानंद हे भारतीय संस्कृती व हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. त्यांच्या भाषणाच्या सुरुवातीच्या 'माझ्या बंधू आणि भगिनींनो!' या दोनच शब्दांनी संपूर्ण जगाला जिंकले होते. भारतीय तत्त्वज्ञानाच्या किनाऱ्यापासून पाश्चात्यांच्या विज्ञानवादापर्यंत समन्वयाचा खळखळाट करत वाहणाऱ्या त्यांच्या अमोघ वक्तृत्ववाणीने सारे पाश्चात्य देश दिपून गेले.

      पाश्चात्यांना भारतीय तत्त्वज्ञानाची शिकवण देऊन 1897 साली ते भारतात परतले. इंग्लंड मधून निघताना एका इंग्रज मित्राने त्यांना एक प्रश्न केला. विलासाची लीला भूमी असलेली पाश्चात्यभूमी सोडल्यावर चार वर्षांनी आपली मातृभूमी आपणाला कशी वाटेल?त्यावर स्वामीजींनी उत्तर दिले, "पाश्चात्य देशात येण्यापूर्वी मी फक्त भारतभूमीवर प्रेम करत होतो. पण आता भारतातील धुळीचे कण व तेथील हवा देखील मला पावित्र्याने भारलेली वाटेल. कारण आता भारत हा माझ्यासाठी तीर्थ होऊन बसला आहे."

      जेव्हा स्वामी विवेकानंदांनी भारतभूमीत प्रवेश केला तेव्हा तेजाचा दैदिप्यमान पुतळा असलेल्या या महान युगपुरुषाच्या स्वागतासाठी संपूर्ण राष्ट्र उभे राहिले. अवघ्या चाळीस वर्षांच्या मर्यादित आयुष्यात अमर्यादित अशा विचार आणि कर्तृत्वाने त्यांनी भारतीयांच्या समोर एक दीपस्तंभ उभा केला.

        स्वामीजींच्या प्रगल्भ बुद्धिमत्तेने सारे जग आश्चर्येचकीत झाले.त्यांच्या अढळ तपस्वीतेतून समाजमनावर आदर्शाचे प्रतिबिंब उमटले.त्यांच्या महान तेजाने सारे जगच दिपून गेले आणि त्यांच्या महान विचारांनी दशदिशाही प्रकाशमान झाल्या.

अशा या युगपुरुषाला विनम्र अभिवादन!





स्वामी विवेकानंद मराठी भाषण Swami Vivekanand Marathi Speech





 स्वामी विवेकानंद मराठी भाषण

 'माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो'असे उद्गार काढून विश्वबंधुतेचे नाते प्रस्थापित करणारे एक थोर भारतीय युगपुरुष स्वामी विवेकानंद यांचे विषयी आज विचार मांडतोय.

    स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 या दिवशी झाला. त्यांना आपण स्वामी विवेकानंद या नावाने ओळखत असलो तरी त्यांचे मूळ नाव नरेंद्र असे होते. त्यांच्या आईचे नाव भुवनेश्वर देवी व वडिलांचे नाव विश्वनाथबाबू असे होते .कोलकाता शहरातील सिमोलीया भागात मकर संक्रांतीच्या पवित्र सणादिवशी त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील वकील होते तर आई भुवनेश्वर देवी हुशार बुद्धिमान व धार्मिक वृत्तीच्या होत्या. अशा मातापित्यांनी नरेंद्र यांना सुसंस्काराचे धडे दिले. ते सर्व प्रकारच्या खेळात तल्लख होते.त्यांची स्मरणशक्ती अजब होती.त्यामुळे ते अभ्यासात हुशार होते.त्यांच्या मनात नेहमी सद्भावना वास करीत होती. त्यांच्या वडिलांनी त्यांना थोर समाज सुधारक ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या शाळेत घातले. लहानपणापासून नरेंद्र यांना उत्तम एकाग्रतेची देणगी लाभली होती. त्यामुळे ते कोणताही विषय आत्मसात करीत होते. शालेय अभ्यासात हुशार असल्याने ते मॅट्रिकच्या परीक्षेमध्ये पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. पुढील महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी आपले नाव दाखल केले. त्यांना सर्वच विषयांमध्ये गोडी होती. ते वाचनालयात जाऊन विविध विषयांचे सखोल वाचन करत असत. त्यांनी पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचे सर्व ग्रंथ वाचून काढले.त्यामुळे त्यांची स्मरणशक्ती अधिक चिकित्सक बनली.

   नोव्हेंबर 1880 मध्ये नरेंद्रची ओळख दक्षिणेश्वरात रामकृष्ण परमहंशांशी झाली. त्यांना नरेंद्र यांचे विषयी प्रेम जिव्हाळा आपुलकी निर्माण झाली. ते नरेंद्र यांचे गुरु बनले. त्याचबरोबर परमहंस आणि योग मार्गाचा आपला वसा विवेकानंद यांच्याकडे सोपवला आणि कार्यास प्रारंभ करण्यास सांगितले.

      नरेंद्र यांनी हिंदू धर्म व तत्वज्ञान यांचा सखोल अभ्यास केला.1893 मध्ये त्यांना अमेरिकेतील शिकागो येथे भरणाऱ्या जागतिक सर्वधर्म परिषदेची माहिती कळाली. या संमेलनाला उपस्थित राहण्यासाठी नरेंद्र आगबोटीने अमेरिकेला रवाना झाले. सर्व प्रकारे तयारी दर्शवून त्यांनी या परिषदेला जाण्याचा आग्रह दर्शविला आणि या परिषदेत जाण्याचा निश्चय त्यांनी केला. त्यांनी संन्यासाचा स्वीकार अंगीकारला व स्वामी विवेकानंद नाव धारण केले. 31 मे 1893 रोजी शिकागोस गेले. त्या ठिकाणी आलेले जगभरातील नानाधर्मीय लोक स्वामी विवेकानंदांना पाहून प्रभावित झाले आणि याच ठिकाणी त्यांनी 'माझ्या बंधू भगिनींनो' असे उद्गार काढून उपस्थित रसिक श्रोत्यांची मनी जिंकली. त्यांच्या हृदयाची पकड घट्ट केली. त्यांचा संदेश हा नवजीवनाचा संदेश होता.व्याख्याने देत आणि पाश्चात्यांना भारतीय तत्त्वज्ञानाची शिकवण देत ते अमेरिकेत बरेच महिने राहिले. त्यांनी आपल्या व्याख्यानामध्ये एका धर्माचा दुसऱ्या धर्माशी झगडा असू शकत नाही, सर्वांनी एकजुटीने लढायचे आहे, क्रांती घडवायची आहे, स्नेहबंध निर्माण करणारे उद्गार त्यांनी काढले तसेच त्यांनी या परिषदेमध्ये ओघवत्या भाषेत हिंदू धर्माची श्रेष्ठता सर्वांना पटवून दिली.

        त्यांच्या भाषणामुळे स्वामी विवेकानंद यांची ओळख सर्वांनाच झाली. कोणतीही व्यक्ती त्यांच्याबरोबर मनमोकळेपणाने बोलू शकत होती. एकदा अशीच एक अमेरिकन महिला त्यांच्याजवळ येऊन त्यांच्याबरोबर संभाषण करू लागली. बोलता-बोलता विवेकानंद यांना तिने उगीचच खोदून विचारले, " स्वामीजी तुमच्या अंगावरचे कपडे भारतीय असूनही पायातील बूट मात्र परदेशी बनावटीचा आहे हा फरक कसा हो? " स्वामीजींना प्रश्न कळाला होता.त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य पिकले.त्यांनी उत्तर दिले, " मी एक संन्याशी.लोकांनी जे प्रेमाने दिले ते मी घेतले. त्यात माझे तुझे असा भेदभाव नाही.मी जोपर्यंत या देशात आहे, त्याचा मी तोपर्यंत आदर्श स्वीकार करेन मात्र येथून निघून जाताना ते येथेच ठेवून जाईन!" बाई अधिक थिजल्या. एवढ्या मोठ्या माणसाला अशा एका क्षुल्लक प्रश्नाच्या मुद्द्यावरून कात्रीत धरण्याचा आपला प्रश्न मूर्खपणाचा होता,याची जाणीव झाल्याने ती क्षणभर नाराज झाली.

      अमेरिकेतील कार्य असे चालू राहील, अशी व्यवस्था करून स्वामीजी इंग्लंडला आले.त्याही ठिकाणी व्याख्याने दिली. इंग्लंडमध्येही त्यांना अनेक सहकारी मिळाले. आपल्या परदेशातील वास्तव्यात स्वामी विवेकानंदांनी आपल्या धर्म,संस्कृतीची पताका पाश्चिमात्य देशात फडकावून हिंदू धर्माचे उज्वल दर्शन घडविले.1896 च्या अखेर स्वामी विवेकानंद भारतात परतले. परदेशातील समृद्धी व सुबत्ता पाहून भारतातील गरिबी व हालाखी अधिक जाणवली.  1897 रोजी त्यांनी रामकृष्ण परिवाराची बैठक बोलावून समाजाच्या उद्धारासाठी एक सेवासेना उभारण्याचे स्वप्न त्यांनी मनी बाळगले होते. हा विचार बैठकीमध्ये मांडला आणि तो सर्वांना मान्य झाला आणि रामकृष्ण मिशनची स्थापना केली. प्रत्येक धर्माच्या अनुयायांमध्ये बंधुभाव उत्पन्न व्हावा यासाठी रामकृष्ण परमहंसानी केलेल्या कार्याची धुरा या मिशनने खंबीरपणे आपल्या खांद्यावर घेतली.राष्ट्राची उभारणी करण्याचे कार्य या मिशनने हाती घेतले.

      राष्ट्र उभारणीचे दिव्य स्वप्न उराशी धरून कार्य करीत असताना स्वामी विवेकानंदांची प्रकृती खालावत चालली होती आणि त्यांना दम्यासारख्या विकाराने पछाडले.अशा परिस्थितीत ही त्यांचे राष्ट्र उभारणीचे व समाज प्रबोधनाच्या विचारांचा प्रसार व प्रचार अखंडपणे चालूच होता. अशा परिस्थितीतच ते पुन्हा 1899 साली परदेशाच्या प्रवासाला निघाले आणि न्यूयॉर्कमध्ये जाऊन त्यांनी वेदांत सोसायटीची स्थापना केली. त्याचबरोबर कॅलिफोर्नियात शांती आश्रमाची स्थापना केली.पॅरिसमधील भरलेल्या धर्म उत्क्रांती परिषदेस ही उपस्थित राहिले आणि ते पुन्हा भारतात परतले आणि याच प्रवासात त्यांना दम्याच्या विकाराबरोबर मधुमेहाचा विकार जडला. मात्र त्यांचे राष्ट्र उभारणीचे कार्य युद्धपातळीवर सुरूच होते. 4 जुलै 1902 रोजी त्यांनी लवकर उठून तीन तास ध्यान केले.काही तास आश्रमवासीयांशी विविध विषयांवर चर्चा केली.नंतर शांतपणे योग मार्गाने त्यांनी देह विसर्जन केले.अवघे 39 वर्षे आयुष्य स्वामी विवेकानंदांना लाभले. मात्र अल्पावधीत त्यांनी केलेले कार्य वाखाण्याजोगे आहे.म्हणून मी राष्ट्रपुरुष स्वामी विवेकानंदांना अभिवादन करतो. धन्यवाद!







Tuesday, December 20, 2022

स्वच्छतेचा महामंत्र देणारे आधुनिक संत संत गाडगेबाबा




 नमस्कार मित्रांनो,

आज आपण 'संत गाडगेबाबा ' यांचे जीवनकार्य व शिकवण पाहुयात.

अध्यक्ष महाशय माननीय.... सर, प्रमुख उपस्थित दर्शविणारे माननीय... सर. सदैव विद्यार्थ्यांना ज्ञानी आणि सुसंस्कृत घडविण्यासाठी झटणारे आमचे गुरुजनवर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो.

आज मी संत गाडगेबाबा यांच्या जीवनावर भाषण करणार आहे आणि ते आपण शांतपणे ऐकाल यात तीळमात्रही शंका नाही. संत गाडगेबाबा म्हणजे एक थोर समाजसुधारक! संत गाडगेबाबांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील एका खेड्यात झाला.

   १८७६ मध्ये जन्मलेल्या गाडगेमहाराजांनी आपले आयुष्य लोकसेवेसाठीच घालवले. त्यांचे बालपणीचे नाव होते डेबू . डेबूच्या वडीलांचे डेबू लहान असतानाच निधन झाले. पित्याचे छत्र हरपले. घरात भयंकर दारिद्रय. अशा अवस्थेत डेबू मामाकडे राहू लागला. घरची व शेतीची कामे करू लागला. डेबू सगळी कामे मन लावून करीत होता; पण अचानक एके दिवशी म्हणजे १९०५ मध्ये आपल्या तरुणपणात डेबू मामाचे घर सोडून निघून गेला. तो पुन्हा कधी घरी परतला नाही. 'हे विश्वची माझे घर' असे म्हणत डेबूने वाट फुटेल तिकडे आपला प्रवास सुरू केला. अंगात फाटकी कपडे, दाढी वाढलेली, हातात एखादी काठी अशा अवस्थेत गावोगावी फिरत राहिला. एखाद्या गावात जाऊन दिवसभर गावातले रस्ते, चौक झाडून साफ करायचा: कुणाची लाकडे तोडून द्यायची. कुणी भाकरी-कालवण दिले तर तेच खाऊन पोटाची खळगी भरायची, असा दिनक्रम सुरू झाला, साफसफाई करताना कुणी विचारले तर सांगायचा, की “आज गावात संध्याकाळी कीर्तन आहे."

देवळाच्या पाटावर सगळे लोक जमा व्हायचे; पण त्यांना कुणी बुवा दिसायचे नाहीत. मग सारा गाव जमा झाला , की संत गाडगेबाबा स्वतःच हातात खापरं घेऊन कीर्तनाला सुरुवात करायचे. 'गोपाला गोपाला, देवकीनंदन गोपाला. 'आपल्या सुमधुर आवाजात ते कीर्तनात लोकांनी सामील करून घ्यायचे. समाजातील वाईट चालीरिती, अंधश्रद्धा आणि स्वच्छता या विषयांवर गाडगेबाबा कीर्तन करीत असत.गावातील लोक त्यांची वाणी ऐकून आणि प्रबोधनात्मक भाष्य ऐकून एकदम तल्लीन होऊन जात. लोकांच्या, उद्धारासाठी अंधश्रद्धेवर फटकारे ओढत त्यांनी लोकांना स्वच्छतेचंही महत्त्व पटवून दिलं. स्वतःच हातात झाडू घेऊन त्यांनी गावंच्या गावं स्वच्छ केली. त्याचबरोबर लोकांची मनेदेखील स्वच्छ केली.

संत गाडगेबाबाचे कार्य चालूच होते. आज या गावात, तर उद्या त्या गावात. त्यांचे कीर्तन ऐकून मोठे-धनाढ्य लोक त्यांच्या चरणाशी नतमस्तक होत. अनेकांनी त्यांना पैसे देऊ केले; पण त्यांनी एका पैशालाही हात न लावता गोरगरिबांच्या कल्याणासाठी वापरा, असा सल्ला दिला. याच दानशूर व्यक्तींच्या साहाय्याने बाबांनी अनेक धर्मशाळा उभ्या केल्या. रोगी-महारोगी यांच्यासाठी दवाखाने, अस्पृश्यांसाठी वसतिगृहे, कन्या शाळा अशी विधायक कामेही संत गाडगेबाबांनी केली.

मित्रांनो, संत गाडगेबाबा बुद्धिवादी व समाजहित बघणारे आधुनिक संत होते. त्यांनी समाजाला कानमंत्र दिला, तो म्हणजे असा, की खोटेपणाने वागू नका, फुकटचे खाऊ नका, व्यसनापासून दूर रहा, अस्पृश्यता, अंधश्रद्धा बाळगू नका आणि. मुलांना शिक्षण द्या. स्वतः वैराग्याचे रूप घेऊन संबंध मानवजातीला चांगुलपणाची शिकवण देणारा असा संत विरळच. संत गाडगेबाबांना त्रिवार अभिवादन. एवढे बोलून मी थांबतो.

जय हिंद, जय भारत !

Monday, November 21, 2022

राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ


 राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ 

छत्रपति शिवाजी महाराजांना स्वराज्याचं देखणं स्वप्न ज्यांनी दाखवलं,राज्य हे नुसतंच शब्दांवरती घडत नाही तर त्याला कणखर मनगटाची व कृतीची आवश्यकता असते,हे ज्यांनी आपल्या अमोल वाणीतून छत्रपतींना सूचित केलं त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ.

    जिजाऊंचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला.वडिलांचे नाव लखुजीराव जाधव आणि आईचे नाव म्हाळसाबाई उर्फ गिरिजाबाई असे होते.लखुजीराव जाधव हे एक मोठे वतनदार प्रस्थ होते.जिजाऊंचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला.हा विवाह दौलताबाद या ठिकाणी पर पडला.शहाजीराजे यांना पुणे,सुपे,चाकण, इंदापूर येथील जहागिरी मिळाली होती.१६२५ ते १६२८ या कालखंडात विजापूरचे सरदार म्हणून शहाजीराजे कार्यरत होते.

१९  फेब्रुवारी १६३० ला राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या पोटी शिवनेरी किल्ल्यावर शिवबाचा जन्म झाला.त्याचे पालनपोषण मोठ्या लाडाने व संस्काराने जिजाऊंनी केले.शिवरायांची जडण-घडण करताना मासाहेब जिजाऊंनी गुरुस्थानी राहून शिवरायांना युद्धकला ,मल्लविद्या,गनिमी कावा यांचे सखोल ज्ञान दिले व यातून शिवरायांची जडण-घडण केली.

आपल्या मुलाने 'हिंदवी स्वराज्य' निर्माण करावे,वंचीतांना न्याय द्यावा,मराठ्यांचा छत्रपति व्हावा ही जिजाऊंची इच्छा होती.यासाठी जिजाऊंनी शिवरायांना प्रेरित केले,प्रोत्साहन दिले,मावळ्यांच्या संघटनासाठी छत्रपतींना उपदेश केले.

"शिवबा ,स्वराज्य निर्माण करायचं असेल तर विस्कटलेल्या मावळ्यांना एका छताखाली आणलं पाहिजे तरच स्वराज्याची निर्मिती होऊ शकते." हे विचार शिवरायांना राजमाता जिजाऊंनी दिले.

शिवरायांचा विवाह १६ मे १६४० रोजी सईबाईंशी घडवून आणला.तोरणागड जिंकण्यासाठी प्रेरणा दिली.ज्यावेळी छत्रपति संकटात होते त्यावेळी त्यांना अचूक मार्गदर्शन करणाऱ्या जिजाऊ इतिहासात पाहावयास मिळतात.रयतेचा राजा झाला पाहिजे यासाठी राज्याभिषेकासाठी शिवरायांना प्रेरणा दिली आणि शेतकऱ्यांचा कल्याणकारी राजा म्हणून शिवराय सर्वसामान्यांच्यासाठी समोर उभे राहिले.

    शहाजी महाराज कर्नाटकच्या मोहिमेत गेले असता २३ जानेवारी १६६४ रोजी निधन झाले.तत्कालीन परिस्थितीत पतिनिधनानंतर सती जाण्याची प्रथा होती पण शिवाजीराजांच्या आग्रहामुळे व दूरदृष्टिकोनामुळे जिजाऊ सती गेल्या नाहीत, तर शहाजीराजांच्या स्मृतीला स्मरून त्यांच्या स्वप्नातील 'स्वराज्य निर्मितीचं' स्वप्न साकार करण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले व एक नवा विज्ञानवाद तत्कालीन समाजव्यवस्थेसमोर ठेवून नवा इतिहास घडवला.

 अशा या आदर्श मातेचा मृत्यू १७ जून १६७४ रोजी झाला .३५० वर्षानंतरही एक आदर्श माता म्हणून सर्वसामान्यांच्या मुखामध्ये सन्मानाने,आदराने ,राजमाता ,राष्ट्रमाता जिजाऊंचे नाव घेतले जाते.


Sunday, November 20, 2022

Mahatma Jotiba Fule महात्मा जोतीबा फुले यांचे कार्य

 


विद्येविना मती गेली,

मतीविना निती गेली,

नितीविना गती गेली,

गतीविना वित्त गेले,

वित्ताविना शुद्र खचले,

इतके  अनर्थ एका, 

 अविद्येने केले ।।

                                     हे संपूर्ण समाजातल्या तळागाळातल्या लोकांना ज्यांनी पटवून सांगितले,त्या महापुरुषाचे नाव आहे महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म सासवडजवळ एका खेडेगावात १८ एप्रिल १८२७ रोजी झाला.मूळ गोरे आडनाव असणारे फुले कुटुंबीय आपल्या फुलांच्या व्यवसायामुळे हे कुटुंब फुले या आडनावाने ओळखू लागले.

                                   लहानपणापासून बंडखोर वृत्तीचे असणारे ज्योतिबा त्यांच्या कर्तृत्वातून आपल्याला पाहावयास मिळतात.शिक्षण हे साध्य नसून ते परिवर्तनाचे एक साधन आहे, हे महात्मा फुलेंनी ओळखले होते.महात्मा फुलेंनी अशिक्षित मागास समाजाचा विकास करायचा असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे महात्मा फुलेंनी जाणलं.ज्याठिकाणी माणसाला पशुत्वाची वागणूक मिळत होती ,त्या मनुष्याच्या घरापर्यंत शिक्षण पोहोचवण्याचं काम केलं तर तो माणूस स्वाभिमानानं जगू शकतो.हे महात्मा फुलेंनी जाणले होते.शिक्षण हे फक्त विशिष्ट वर्गाची मक्तेदारी होती.अस्पृश्यांनी शिक्षणाचा उल्लेख करणं म्हणजे पाप मानलं जात होतं.अशा कालखंडामध्ये महात्मा फुलेंनी एक क्रांतिकारी विचार आणला व १८३६ साली शाळेची सुरुवात केली.

                                  महात्मा फुलेंनी १८४८ मध्ये पुण्यातल्या भिडेवाडा या ठिकाणी पहिल्यांदा मुलींची शाळा सुरु केली.या कामासाठी त्यांच्या पत्नींनी त्यांना मदत केली .निरक्षर असणाऱ्या पत्नीस पहिल्यांदा साक्षर केल.आपल्या पत्नीस त्या शाळेची शिक्षिका केले.काही कर्मठ सनातनी विचारांच्या लोकांनी त्यांना विरोध केला.त्यांच्या    पत्नीच्या अंगावरती दगड,गोट्यांचा मारा केला.तो त्यांनी सहन केला.त्यांनी आपल्या कृतीतून उत्तर दिले.मुलींची पहिली शाळा १ जानेवारी १८४८ला सुरु केली.जी शाळा महाराष्ट्रातील एकमेव शाळा असेल की ज्या शाळेमध्ये वेगवेगळ्या जाती-धर्मातील मुलींना प्रवेश देण्यात आला.सर्व जातीयता नष्ट व्हावी,समता प्रस्थापित व्हावी,वंचितांचा विकास व्हावा हीच भूमिका डोळ्यासमोर ठेवून या शाळेची सुरुवात केली.महात्मा फुलेंनी मुलींच्या शाळेबरोबरच १८५५ साली प्रौढांच्यासाठी रात्रशाळेची सुरुवात केली.१८६४ साली विधवा पुनर्विवाह याची सुरुवात केली.१८६३ रोजी बालहत्या प्रतिबंधक गृहाची सुरुवात सावित्रीबाई फुलेंच्या मदतीने आपल्या घरामध्ये सुरु केली.समाज हा जातीबंधनात न अडकता तो सत्याच्या दिशेने यावा,एकसंध राहावा याच उदात्त दृष्टीकोणातून सत्यशोधक समाजाची स्थापना केली.महात्मा फुले हे नुसते समाजसुधारक नव्हते तर ते प्रसिद्ध वक्ते, प्रसिद्ध शाहीर,लेखक,कवी म्हणून त्यांच्या वाङ्मयातून पाहावयास मिळतात.'शेतकऱ्यांचा आसूड' या ग्रंथातून शेतकऱ्याविषयी असणरा अभ्यास या ग्रंथातून पाहायला मिळतो.त्यांच्या पोवाड्यातून छत्रपति शिवाजी महाराजांविषयी असणारे प्रेम पाहावयास मिळते.शिवाजी महाराजांची खऱ्या अर्थाने जयंती साजरी करणारा पहिला महापुरुष कोण असेल तर ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले.

                                  विचारातून परिवर्तन करणारे महात्मा फुले पाहावयास मिळतात.महात्मा फुलेंचे कार्य पाहून काही विघ्नसंतोषी लोकांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.पण हल्लेखोरांना जेव्हा महात्मा फुले हे खरंच परिवर्तनाचे शिलेदार आहेत.खरेखुरे समाजसुधारक आहेत हे जेव्हा  मारायला आलेल्या लोकांना कळाले तेव्हा मारेकऱ्यांनी हातातली शास्त्रे टाकून दिली .'जोतीबा आम्हाला माफ करा,आमचं चुकलं,आजपासून आम्ही तुम्ह्या चळवळीचा झेंडा खांद्यावरती घेऊ' अशी शपथ त्या लोकांनी घेतली.त्यांच्याच हातात जोतिबांनी लेखणी देण्याचे कार्य केले.

                              महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याची दाखल ब्रिटीशांनासुद्धा घ्यावी लागली .फुले दांपत्याचे कार्य पाहून या दांपत्याचा पुण्याच्या शनिवारवाड्यासमोर जाहीर सत्कार केला.महात्मा फुलेंनी सतीप्रथा बंद पाडण्यासाठी ब्रिटीशांची मदत घेतली.सतीची पद्धत बंद केली.समाजामध्ये एक आदर्श व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला.

                        या उक्तीप्रमाणे स्वतःच्या दत्तक मुलाचा विवाह सत्यशोधक पद्धतीने  केला व आचरणात आणण्याचा प्रयत्न केला.समाजसुधारणेचे कार्य अखंडपणे करत असताना अशा या महान पुरुषाचे २८ नोव्हेंबर १८९० रोजी दुःखद निधन झाले.महापुरुषाच्या निधनानंतर संपूर्ण देश हळहळत होता.

                           गुलामगिरीविरुद्ध बंड करणर,शिक्षणाचा ध्यास धरून उपेक्षितांचा विकास करणरा ,जातीय विषमतेविरुद्ध प्रखर लढा देणारा,सत्याचा शोध घेऊन संशोधन करणारा ,अस्पृश्यांसाठी शाळा सुरु करणारा ,अशिक्षित ,अज्ञानी लोकांना संघटीत करून त्यांच्या मनामध्ये जागृती करणारा ,मानवी हक्काचं समर्थन करणारा ,नीतीमूल्यांचं पालन करणारा एक समाजसुधारक म्हणून आपल्याला पाहावयास मिळतात.

Saturday, November 5, 2022

इंदिरा गांधी Indira Gandhi







 इंदिरा गांधी यांच्याविषयी छोटा निबंध 

इंदिरा गांधी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या .त्यांचा जन्म अलाहाबाद येथे 'आनंदभवन' या त्यांच्या घरी झाला.त्यांचे बालपण तेथेच गेले.

       भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या त्या एकुलत्या एक व लाडक्या ,स्वरूपसुंदर कन्या होत्या.ते इंदिराजींना प्रौदर्शनी म्हणत.इंदिराजींचे आजोबा त्यांचे सर्व लाड पुरवत.इंदिराजींना देशभक्त घराण्याचा थोर वारसा मिळाला होता.त्यांचे शिक्षण अलाहाबाद,दिल्ली,पुणे व अमेरिकेत झाले.

   वयाच्या चौथ्या वर्षापासून त्यांना त्यांच्या घरी देशातील थोर देशभक्तांचा सहवास लाभला.त्यामुळेच आपल्या देशाला त्यांच्यासारख्या खंबीर व मुत्सद्दी पंतप्रधान म्हणून लाभल्या .त्याच्या काळात देशाची चौफेर प्रगती झाली.

   जगात शांतता नांदावी म्हणून अनेक देशांना त्यांनी एकत्र आणले.आपला देश एकात्मतेने राहावा म्हणून जीवनभर पुष्कळ प्रयत्न केले.त्यातच आपल्या प्राणांची आहुती दिली.

   इंदिराजींचे कार्य भारत देश व जग कधीही विसरणार नाही. 


इतर महत्वाचे निबंध 

सरदार वल्लभभाई पटेल 

इंदिरा गांधी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान 

पंडित जवाहरलाल नेहरू मराठी भाषण /निबंध 


माझी आई My Mother Small essays




छोटा निबंध
  'माझी आई' या विषयवार 

                                जर का मला कोणी प्रश्न विचारला ,तुला आई जास्त आवडते की वडिल जास्त आवडतात ? तर मी त्यांना खणखणीत शब्दात उत्तर देईन ,मला माझी आईच जास्त आवडते.कारण रक्ताचे दुध करून पाजणारी आई हे माझे सर्वस्व आहे.म्हणून मला आई फार आवडते.

                   माझ्या आईसारखं कुणी नाही असं मला वाटतं .माझी आई रोज पहाटे उठते.पहाटेपासून सारखे घरकाम करते.आई कधी कामाचा कंटाळा करत नाही . ती वेळ काढून आम्हाला शिकवते.आईचे बोलणे,हसणे सारेच गोड.

                      कधी कधी माझ्या आवडीचे पदार्थ करून देते.आम्ही मुले चांगली,स्वच्छ व अभ्यासू असावी म्हणून ती फार झटते .आम्ही आजारी पडल्यावर ती  झोपत सुद्धा नाही .

                 आमचे घर आईने स्वच्छ व सुंदर ठेवले आहे.आई जवळ नसल्यावर मला करमत नाही.आई दूरगावी गेल्यावर मला सारखी आठवण येते.

                 माझी आई मला फार आवडते.




Monday, October 31, 2022

सरदार वल्लभभाई पटेल Sardar Vallabhabhai Patel







 सरदार वल्लभभाई पटेल

  Iron Man Of India 

 Sardar Vallabhbhai Patel 

 नमस्कार मित्रांनो ,आज आपण सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर आधारित माहिती पाहणार आहोत.

सरदार वल्लभभाई पटेल भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे के वरिष्ठ नेता होते आणि भारतीय गणराज्य स्थापन करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता.वल्लभभाई झावेरभाई पटेल यांचा जन्म ३१ ऑक्टोबर १८७५ मध्ये नडियाद ,गुजरातमध्ये झाला होता.त्यांच्या वडिलांचे नाव झावेरभाई आणि आईचे नाव लाढबाई असे होते.

वल्लभभाई पटेल यांचे वडील एक शेतकरी होते.त्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या युद्धामध्ये 'झाशीच्या राणीच्या सेनेमध्ये कार्य केले होते.सरदार पटेल यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण आपल्या स्थानिक शाळेमधून आपल्या वडिलांबरोबर शेतीचे काम करत पूर्ण केले होते.सरदार पटेल लहानपणापासूनच बुद्धिमान ,साहसी आणि दृढसंकल्प ठेवणारे व्यक्ती होते.ते नेहमी अन्यायाविरुद्ध आवाज उठवत असत.याच गुणांमुळे त्यांना वकील बनायचे होते.

पैशांची कमी असूनही त्यांनी आपल्या मित्रांकडून पुस्तके मागून वकिलीचा अभ्यास केला आणि जिल्हा वकिलाची परीक्षा ते पास झाले.त्यांनी गोध्रा,गुजरातमध्ये आपली वकिली करायला सुरुवात केली.१९०२ मध्ये ते वलसाड येथे आले आणि जिल्हा मुख्यालयामध्ये यशस्वीपणे ८ वर्षे गुन्हेगारीवर वकिली केली.जेणेकरून त्यांनी आपल्या कुटुंबाला आर्थिक रूपाने स्थिर केले. 

पैशांची कमी दूर केल्यानंतर त्यांनी विवाह केला.त्यांना दोन मुले होती.सन १९१० मध्ये उच्च शिक्षण प्राप्त करण्यासाठी ते लंडनला गेले आणि तेथे परीक्षांमध्ये प्रथम आले.मग ते भारतात परतल्यावर अहमदाबाद येथे वकिली करू लागले.




जेव्हा सरदार पटेल १९१७ मध्ये महात्मा गांधीजींना भेटले तेव्हा त्यांचे जीवन पूर्णपणे बदलून गेले.जेव्हा त्यांनी गांधीजींचे स्वतंत्र भारताचे स्वप्न आणि अहिंसेचे तत्वज्ञान बघितले .सन १९१८ मध्ये गुजरातच्या खेडा येथे भयंकर दुष्काळ पडला होता .म्हणून शेतकऱ्यांनी इंग्रज सरकारला करमाफी करण्याचे निवेदन केले पण इंग्रज सरकारने ते नाकारले.तेव्हा सरदार पटेल यांनी शेतकऱ्यांचे नेतृत्व केले आणि शेतकऱ्यांना कर न देण्यास सांगितले.सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासमोर इंग्रज सरकारला माघार घ्यावी लागली आणि कर माफ करावा लागला.हे सरदार पटेल यांचे पहिले मोठे यश होते.



 बार्डोली सत्याग्रहाच्या निमित्ताने सन १९२८ मध्ये गुजरातमध्ये एक प्रमुख किसान आंदोलन झाले,ज्याचे नेतृत्व स्वतः सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले होते.या आंदोलनामध्ये इंग्रज सरकारला माघार घ्यायला भाग पाडले होते आणि सरदार पटेल यांच्यामुळे शेतकऱ्यांचा विजय झाला होता.या सत्याग्रहाच्या यशानंतर लोकांनी वल्लभभाई पटेल यांना 'सरदार' ही उपाधी दिली होती,ज्याचा अर्थ आपला मुख्य किंवा आपला राजा असा होतो.तेव्हापासून त्यांना सरदार वल्लभभाई पटेल या नावाने ओळखले जाऊ लागले.

सरदार वल्लभभाई पटेल यांनी इंग्रज सरकारच्या विरोधात खूप सारी आंदोलने केली.१९४२ मध्ये महात्मा  गांधीजींच्या 'भारत छोडो' आंदोलनामध्ये सरदार पटेल यांनी पूर्ण सहकार्य केले.त्यांना याच कारणामुळे तुरुंगवासदेखील झाला होता.

     स्वातंत्र्याच्या आधी आपला भारत देश ५८४ राज्यांमध्ये वाटला गेला होता.सरदार पटेल यांनी या राज्यांना एकत्र आणण्यावर जोर दिला होता आणि सर्व राज्यांना इंग्रजसरकारविरुद्ध होण्यास सांगितले होते.ते पूर्ण देशाला एक करण्याच्या प्रयत्नांमध्ये होते.त्यांना Iron Man Of India भारताचे पोलादी पुरुष ही उपाधी दिली होती.कारण आज आपला भारत देश एकसंघ भारत देश पाहतो आहोत तो सरदार पटेल यांच्या या कार्यामुळेच.

१९४७ मध्ये ते स्वतंत्र भारताचे पहिले उपप्रधानमंत्री आणि गृहमंत्री बनले.त्यांनी IAS आणि IPS चि स्थापना करण्यामध्ये सहाय्य केले होते.म्हणून त्यांना भारतीय सेवेचा संरक्षक संत असेही म्हटले जाते.

१५ डिसेंबर १९५० मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला.त्यांच्या अंतिम संस्कारासाठी १० लाख लोक आले होते.त्यांना त्यांच्या कार्यामुळे 'भारतरत्न' हा पुरस्कार देण्यात आला होता.भारतात खूप सारी महाविद्यालये आणि  संस्था  त्यांच्या नावाने उघडण्यात आल्या आहेत.

  गुजरातमध्ये सरदार सरोवर बांध आहे जो नर्मदा नदीवर स्थित आहे.तिथे सरदार पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा बांधण्यात आला आहे.'Statue Of Unity' 'स्टॅच्यू ऑफ युनिटी ' या नावाने तो प्रसिध्द आहे.



सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस 'राष्ट्रीय एकता दिवस' या नावाने साजरा केला जातो.

धन्यवाद ! 


आपल्याला हा लेख कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा.